⭐ स्टार माझा न्यूज
बार्शी | प्रतिनिधी दिनांक 15 बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “अमावस्या ऑल आऊट” विशेष मोहिमेत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर बार्शी तालुका पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी तालुक्यात विविध ठिकाणी विशेष नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळून आलेल्या चार वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
लक्झरी बस चालक मद्यधुंद; ३२ प्रवाशांचा जीव धोक्यात
या कारवाईतील सर्वात गंभीर बाब म्हणजे लातूरहून पुण्याकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसचा चालक दारूच्या नशेत वाहन चालविताना पोलिसांच्या तावडीत सापडला. सदर बसमध्ये सुमारे ३२ प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या बेजबाबदारपणामुळे सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

बार्शी तालुका पोलिसांनी तात्काळ बस थांबवून चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता तो मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित चालकावर मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १८५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली.
दारू पिऊन वाहन चालवू नका; पोलिसांचा इशारा
बार्शी तालुका पोलीस स्टेशनकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले असून दारू पिऊन वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा असून अशा वाहनचालकांविरोधात यापुढेही सातत्याने कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांचा सहभाग
या विशेष मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पो. उपनि. शिरगिरे, ग्रेड पीएसआय यावलकर, ट्रॅफिक पोना जगताप, पोना माने व पोना चौधरी यांनी सक्रिय सहभाग घेऊन मोहीम यशस्वी केली.
स्टार माझा न्यूज
🖊️ संपादक : रियाज पठाण
📞 मो. 9405749898 / 9408749898
🌐 www.starmazanews.com







