UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

मंदिर चोरीविरोधात कंडारीत ‘शोले स्टाईल’ आंदोलन!

SHARE:

 

मंदिराच्या शिखरावर चढून ग्रामस्थांचे उपोषण; ‘चोराला अटक होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही’

स्टार माझा न्यूज

परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने| दि. ८ ऑक्टोबर २०२६

कंडारी : तीर्थक्षेत्र कंडारी येथील श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरातील देवाचा मुखवटा चोरीला गेल्याच्या घटनेने ग्रामस्थ व भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चोरीच्या घटनेचा तात्काळ तपास करून मुखवटा शोधून काढावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी दि. ७ ऑक्टोबर रोजी मंदिराच्या शिखरावर चढून ‘शोले स्टाईल’ उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

दि. ३० सप्टेंबर रोजी श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरातून देवाचा मुखवटा चोरीस गेल्याची घटना घडली. या घटनेमुळे ग्रामस्थ तसेच भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, चोरीच्या घटनेचा तात्काळ व निष्पक्ष तपास करून चोरीस गेलेला मुखवटा परत मिळवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

या प्रकरणी ग्रामस्थांनी यापूर्वी दि. ३ ऑक्टोबर रोजी परंडा तहसीलदारांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, मागण्यांवर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले.

👉एफआयआरला विलंब; पोलिसांच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा सवाल

मंदिराचे पुजारी विलास क्षीरसागर यांनी चोरीची घटना घडल्यानंतर आंबी पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करण्याची विनंती केली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे दि. ३ ऑक्टोबरपर्यंत एफआयआर दाखल करता आला नाही, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.

एफआयआर दाखल करण्यास झालेल्या विलंबाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच तपासाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणीही काही ग्रामस्थांनी केली आहे.

👉प्रशासनाची मध्यस्थी निष्फळ

दरम्यान, नायब तहसीलदार विजयकुमार बडकर व मंडळ अधिकारी एस. के. शेख यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी त्यास प्रतिसाद न देता जोपर्यंत चोरीचा तपास पूर्ण होत नाही, चोराला अटक होत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल डोके, उपसरपंच बाबासाहेब तिंबोळे उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एपीआय अर्जुन चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला होता.

👉ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

मंदिरातील चोरीच्या घटनेचा तात्काळ व निष्पक्ष तपास करावा.

👉चोरीस गेलेला श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी देवाचा मुखवटा तात्काळ शोधून मिळवावा.

चोरीतील दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.

एफआयआर दाखल करण्यास झालेल्या विलंबाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी.

👉मंदिराची सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी.

तपासाची सद्यस्थिती व झालेल्या कार्यवाहीची माहिती ग्रामस्थांना द्यावी.

मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

उपोषणकर्ते

अमोल संदिपान तिंबोळे, रामदास आदेश डांगे, मंगल विलास क्षीरसागर, राहुल बिभीषण गाढवे, सचिन सुग्रीव तिंबोळे आणि ब्रम्हदेव कालिदास तिंबोळे हे उपोषणाला बसले आहेत.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण

9405749898 / 9408749898

 

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें