स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
दिनांक : १३ सप्टेंबर २०२६
परंडा शहरात सोमवारी गणरायाचे ढोल-ताशे, हलगीच्या कडकडाटात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शहरातील गल्लीबोळ दुमदुमून गेले. घरोघरी तसेच परवानगी मिळालेल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी विधिवत श्रींची प्रतिष्ठापना केली.
शहरातील आठवडी बाजार मैदानावर गणेशमूर्ती विक्रीसाठी विविध आकर्षक स्टॉल आणि दुकाने थाटण्यात आली होती. सजवलेल्या स्टॉलवर गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच नागरिक, गणेशभक्त, बाळगोपाळ आणि ग्रामीण भागातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विविध रंगसंगती, कलाकुसर आणि आकारातील लहान-मोठ्या आकर्षक गणेशमूर्ती यंदा विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांनी मागील काही महिन्यांपासून मेहनत घेत विविध प्रकारच्या मूर्ती तयार केल्या होत्या. कच्च्या मालासाठी आर्थिक जुळवाजुळव करत यंदा मूर्तींमध्ये अधिक विविधता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे गणेशभक्तांनाही आकर्षक मूर्ती पसंतीस पडल्या. यंदा मूर्तींच्या किमतीत किंचित वाढ झाली असली तरी भाविकांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती खरेदी केल्याचे मूर्ती विक्रेते लहु कुंभार यांनी सांगितले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी आठवडी बाजार असल्याने पावसामुळे व्यापारी व नागरिकांची काही प्रमाणात धावपळ झाली होती. मात्र सोमवारी गणरायाच्या आगमनामुळे शहरातील वातावरण पुन्हा उत्साहाने भारून गेले.
घरोघरी गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी आकर्षक आरास, सजावट आणि मखर तयार करण्यात आले होते. चौरंगावर विधिवत पूजापाठ करून बाप्पांना विराजमान करण्यात आले. खीर, मोदकाचा नैवेद्य दाखवत ‘सुखकर्ता-दुःखहर्ता’च्या मंगलमय स्वरांनी घराघरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बालगोपाळांच्या आनंदाला उधाण आले होते. मागील दोन दिवसांपासून छोटेखानी मंडप, आरास, लाईटमाळा आणि विविध सजावटीसाठी शालेय मुले, बाळगोपाळ आणि तरुणाईची मोठी लगबग सुरू होती. प्रतिष्ठापनेसाठी गणेशमूर्ती घेऊन जाताना युवकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला.
शहरातील मानाचा एकमेव ट्रस्टी जय भवानी गणेश मंडळ, मानाचा बालवीर गणेश मंडळ, शिवछत्रपती गणेश मंडळ, जय हनुमान टेंबे गणेश मंडळ, हंसराज गणेश मंडळ, विठ्ठल गणेश मंडळ, नरवीर गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ, नृसिंह गणपती, कमांडो करिअर अकॅडमी, क्रांती अकॅडमी आदी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची सकाळपासूनच श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी धावपळ सुरू होती.
शहरात १० तर ग्रामीण भागात ४८ मंडळांना परवानगी
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आलेल्या ऑनलाइन अर्जानुसार परंडा शहरातील १० आणि ग्रामीण भागातील ४८, अशा एकूण ५८ गणेश मंडळांना परवानगी देण्याचे काम पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पोलीस हवालदार नितीन गुंडाळे यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल चोरमुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व गृहरक्षक दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आसाराम चोरमुले यांनी दिली.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण
9405749898 / 9408749898







