स्टार माझा न्यूज बार्शी | प्रतिनिधी
“राम कृष्ण हरी… ईद-ए-मिलादच्या पवित्र पर्वातून माणुसकीचा संदेश!” या भावनेतून मागील पंधरा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उडान फाउंडेशनच्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्त बार्शी तालुक्यातील अनाथ व निराधार मुलांसाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
बार्शी तालुक्यातील श्री गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्था ही विना अनुदानित संस्था गेल्या पाच वर्षांपासून अनाथ व निराधार मुलांच्या शिक्षण, संगोपनासाठी प्रामाणिकपणे कार्यरत आहे. या संस्थेतील काही मुलांच्या डोक्यावर आई-वडिलांचे छत्र नाही, तर काही निराधार महिलांचाही येथे आधार घेतला जात आहे. अशा गरजू घटकांसाठी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने उडान फाउंडेशनने अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि मिठाईचे वाटप केले.
उडान फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील रुग्ण, गोरगरीब, अनाथ, निराधार तसेच मुक्या प्राण्यांना सातत्याने मदतीचा हात दिला जात आहे. “अनाथांचे नाथ” बनून विविधतेतून एकतेचा संदेश देणारे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास बार्शी पोलीस स्टेशनचे एपीआय धनवे साहेब, स्मार्ट अकॅडमीचे संस्थापक व पत्रकार सचिन वायकुळे सर, बार्शी नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत मालक कथले, बांधकाम समिती सभापती दीपक आबा राऊत, ऑर्थोपेडिक डॉक्टर मौला शेख, गोरगरिबांचे डॉक्टर सलीम अंगरशा, माजी नगरसेवक करीमभाई पटेल, सादिकभाई मुल्ला, किरण कोकाटे सर, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा राऊत, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष टिंकूभैया पाटील यांच्यासह पत्रकार बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव करत, कोणत्याही मोठ्या प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता अनाथ मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले. छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून टिंकूभैया पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तही या संस्थेला अन्नधान्य व खाऊचे वाटप करण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या उपक्रमामुळे संस्थेच्या कार्याची माहिती समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचली असून, अनेक दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांनी भविष्यातही मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले.
उडान फाउंडेशनचे अध्यक्ष इरफानभाई शेख, उपाध्यक्ष जाफरभाई शेख, सचिव जमीलभाई खान, कार्याध्यक्ष शकीलभाई मुलानी, सहसचिव मोहसीनभाई पठाण, सहसचिव अख्तरभाई शेख, साजनभाई शेख यांच्यासह सर्व सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.
दरम्यान, श्री गुरुदेव दत्त बहुउद्देशीय अनाथ मुलांच्या संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. श्री सागर महाराज कोल्हाळे, श्री अरुण महाराज कोल्हाळे तसेच संस्थेचे सहसचिव तुळशीदास मस्के यांनी उपस्थित मान्यवर आणि उडान फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
संस्थेला स्वतःची जागा व सभागृहाची आवश्यकता असून, या समस्येची माहिती बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते व सोलापूर जिल्हा विधान परिषद आमदार राजाभाऊ राऊत यांच्यापर्यंत पोहोचवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन प्रशांत मालक कथले यांनी यावेळी दिले.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने उडान फाउंडेशनने दिलेला माणुसकी, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश उपस्थितांच्या मनाला भावला. समाजातील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी अशा उपक्रमांना पाठबळ दिल्यास अनाथ व निराधार मुलांच्या शिक्षण-संगोपनाला मोठी मदत मिळू शकते.
“माणुसकीला धर्माची सीमा नसते; मदतीचा हातच खरा मानवतेचा धर्म!”
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण
9405749898 / 9408749898







