UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

बार्शीत विनापरवाना डीजे वाजविणाऱ्यावर गुन्हा दाखल.

SHARE:

 

रस्त्यावर केक कापणे, फटाके उडवणे अन् बेशिस्तपणाला लगाम; पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांचा इशारा

स्टार माझा न्यूज

बार्शी | प्रतिनिधी

दि. ८ ऑगस्ट २०२६

बार्शी शहरातील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे वाजवून धिंगाणा घालणाऱ्यांवर बार्शी शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर करून डीजे वाजविणे तसेच असभ्य हावभाव करत नृत्य केल्याप्रकरणी डीजे ऑपरेटरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

🔴 तीन कंदील चौकात पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास बार्शी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शहरात गस्त घालत होते. यावेळी सोमवार पेठेतील तीन कंदील चौक येथे विनापरवाना ध्वनीक्षेपक सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमून डीजेवर मोठ्या आवाजात गाणी लावत नृत्य करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी डीजे ऑपरेटर आकाश नागनाथ मस्के (रा. नवीन रेल्वे स्टेशन रोड, बार्शी) याच्याकडे ध्वनीक्षेपक वापरण्याची सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आहे का, याबाबत चौकशी केली. त्यावेळी परवानगी घेतली नसल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी फिर्यादी पोकॉ. कादर तांबोळी यांच्या फिर्यादीवरून आकाश मस्के याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३१ व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

⚠️ जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी आदेश जारी करून ५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१)(३) अन्वये आदेश लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर विनापरवाना डीजे वाजविण्याची घटना गंभीर मानली जात असून, संबंधित व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

🎂 रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांनाही इशारा!

दरम्यान, बार्शी शहर पोलिसांनी रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली होणाऱ्या बेशिस्त प्रकारांवरही लक्ष केंद्रित केले आहे. रस्त्यावर दुचाकी आडव्या लावणे, दुचाकीवर केक कापणे, फटाके उडविणे तसेच सार्वजनिक वाहतुकीला आणि शांततेला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकारांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

“रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे गैरकृत्य आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील,” असा स्पष्ट इशारा बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी दिला आहे.

🚔 बेशिस्तपणाला लगाम; पोलिसांचा ॲक्शन मोड!

शहरातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे वाढदिवस, मिरवणूक अथवा इतर कार्यक्रमांच्या नावाखाली विनापरवाना डीजे, मोठा आवाज, रस्त्यावर धिंगाणा, फटाके आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे आणि कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन बार्शी शहर पोलिसांनी केले आहे

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें