UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ परंडा शहर कडकडीत बंद.

SHARE:

 

(वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; व्यापारी, नागरिक, शैक्षणिक संस्था व विविध संघटनांचा सहभाग)

 

 

परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने परंडा दि. 23 जुलै 2026

    परंडा, दि. २३ : दिल्ली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला परंडा शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले, विविध आस्थापने आणि बहुतांश दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत होता. व्यापारी, नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा देत लोकशाही मूल्यांच्या समर्थनाची भूमिका व्यक्त केली.

    वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीतील घटनेचा तीव्र निषेध नोंदवत २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असताना परंडा शहरातही बंद पूर्णतः यशस्वी झाल्याचे चित्र दिसून आले.

     वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांनी बंददरम्यान सर्व कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू न देता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बंद पाळला. शहरातील विविध भागांत कार्यकर्त्यांनी भेटी देऊन व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला तसेच बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.

     बंददरम्यान शहरातील वातावरण पूर्णतः शांत होते. मुख्य बाजारपेठा ओस पडल्या होत्या. किरकोळ व्यापाऱ्यांपासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत अनेकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. शहरातील अनेक शाळा, महाविद्यालये आणि काही खासगी आस्थापनांनीही बंदला पाठिंबा दर्शवत कामकाज बंद ठेवले. त्यामुळे परंडा शहरात बंदचा व्यापक परिणाम जाणवला.

      यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा संघर्ष केवळ एका राजकीय पक्षाचा नसून लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणाचा आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असून अशा घटनांविरोधात सर्व पुरोगामी, लोकशाहीवादी आणि समविचारी शक्तींनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

       या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे मोहनदादा बनसोडे, किरणदादा बनसोडे, इर्शाद बागवान, मधुकर सुरवसे, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना तसेच अनेक राजकीय पक्षांनीही या बंदला आपला पाठिंबा जाहीर केला.

      बंददरम्यान पोलीस प्रशासनाने शहरात आवश्यक बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता संपूर्ण बंद शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

       परंडा शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दिलेल्या प्रतिसादामुळे हा बंद यशस्वी ठरल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत जनतेमध्ये असलेली संवेदनशीलता या बंदच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें