परंडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने– परंडा तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांची दिव्यांग प्रमाणपत्रे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याने दिव्यांगांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वैद्यकीय मंडळ (बोर्ड) वेळेत न होणे, आवश्यक सह्या प्रलंबित राहणे तसेच प्रशासकीय दिरंगाई यामुळे अनेक दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधित कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारूनही अनेक अर्जदारांची प्रमाणपत्रे तब्बल एक वर्षापासून प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, “कधी बोर्ड तयार होणार आणि कधी प्रमाणपत्रे मिळणार?” या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने दिव्यांग नागरिक प्रशासनाकडे आशेने पाहत आहेत.
प्रमाणपत्रे रखडल्यामुळे शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे दिव्यांग बांधवांनी सांगितले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांग व्यक्तींना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
याबाबत **दिव्यांग उद्योग समूह संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी घोडके** यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. **दिव्यांग तालुकाध्यक्ष तानाजी सांगडे** व **शहरप्रमुख गोरख देशमाने** यांनी सांगितले की, “आठ दिवसांच्या आत प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्रांचा प्रश्न मार्गी लावून संबंधितांना प्रमाणपत्रे देण्यात यावीत. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
दरम्यान, दिव्यांग बांधवांच्या या गंभीर प्रश्नावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि प्रलंबित प्रमाणपत्रांचा प्रश्न किती लवकर सोडवते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







