UDHYAM-MH-32-0003320

UDHYAM-MH-32-0003320

⚡ बार्शीच्या रस्त्यांवर नियमांना हरताळ; अल्पवयीन चालक आणि मॉडिफाईड सायलेन्सरचा कहर!

SHARE:

सायलेन्सरवर रोड रोलर, पण बेफिकीर वाहनचालकांवर कधी फिरणार कायद्याचा रोलर?

 अल्पवयीन वाहनचालकांचाही वाढता वावर चिंतेचा विषय

स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : 09 जून 2026

पोलिसांच्या कारवाईनंतरही परिस्थितीत फारसा बदल नाही

बार्शी शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी फटाका सायलेन्सर व कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरधारक वाहनांवर धडक कारवाई करत जप्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून कठोर संदेश दिला होता. मात्र या कारवाईला आठ दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही शहरातील अनेक रस्त्यांवर अशा वाहनांचा वावर अजूनही सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

केवळ बुलेटच नव्हे तर इतर दुचाकींनाही मॉडिफाईड सायलेन्सर

मोठा आवाज करणारे सायलेन्सर केवळ बुलेट मोटारसायकलींनाच लावले जातात असे नाही. शहरातील अनेक दुचाकी वाहनांमध्ये नियमबाह्य मॉडिफाईड सायलेन्सर बसविण्यात आले असून या वाहनांमधून फटाक्यासारखे आवाज काढले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कॉलेज, हॉस्पिटल आणि दवाखाना परिसरात वाढती समस्या

विशेषतः कॉलेज परिसर, हॉस्पिटल परिसर, दवाखाने तसेच गर्दीच्या भागांमध्ये अशा वाहनांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांना या कर्णकर्कश्य आवाजाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे परिसरातील शांततेलाही बाधा पोहोचत आहे.

तरुणांमध्ये वाढते आकर्षण

शहरात मोठा आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करणाऱ्यांमध्ये तरुण युवकांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविणे किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी काही युवक अशा वाहनांचा वापर करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

शाळा सुरू; अल्पवयीन वाहनचालकांची वाढती संख्या

सध्या शाळा व महाविद्यालये सुरू झाली असून अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना शहरातील विविध रस्त्यांवर सर्रास दिसत आहेत. विशेषतः शाळा, कॉलेज परिसर आणि प्रमुख चौकांमध्ये वयाची अट पूर्ण न केलेले विद्यार्थी वाहन चालवताना आढळून येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहन चालविण्याचा परवाना नसताना रस्त्यावर वाहन चालविणे हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाला धोकादायक ठरू शकते.

अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता

अनुभवाचा अभाव, वाहतूक नियमांची अपुरी माहिती आणि वेगाची आवड यामुळे अल्पवयीन वाहनचालकांकडून अपघात होण्याची शक्यता वाढत आहे. यामुळे गंभीर अपघात घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा वाहनांवर आणि संबंधित पालकांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सातत्यपूर्ण कारवाईची नागरिकांची मागणी

फक्त सायलेन्सर जप्त करून न थांबता मॉडिफाईड सायलेन्सरधारक वाहनांवर, ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांवरही सातत्याने दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी, वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

 

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें