परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने ता १७ : त्याग, संघर्ष आणि शौर्याचा साक्षीदार असलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माहिती अधिकार कार्यकर्ता तसेच पत्रकार विजय मेहेर यांच्या वतीने कै. रावसाहेब प्राथमिक विद्यालय, परंडा येथे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेतील तब्बल १५० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
१७ सप्टेंबर १९४८ हा मराठवाड्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी मराठवाडा निजामशाहीच्या राजवटीतून मुक्त झाला आणि भारतीय संघराज्यात सहभागी झाला. या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी हातभार लागावा आणि समाजातील विविध घटकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, हा उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारूख शेख, जमीर सिकलकर, शाळेतील शिक्षक, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप होताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.







