शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा! बोरवेल खोदाईचे दर ६० ते ८० रुपये प्रतिफूट करा; राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी!
बोरवेल चालकांच्या मनमानी दरांना लगाम घालण्याची मागणी; दरपत्रक, पावती आणि जादा पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी.
बार्शी | स्टार माझा न्यूज प्रतिनिधी दिनांक 26
बार्शी तालुक्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बोरवेल खोदणे आवश्यक झाले असताना बोरवेल गाडीधारकांकडून मनमानी पद्धतीने दर आकारले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
बोरवेल खोदाईचे दर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बार्शी तालुकाध्यक्ष बापूसाहेब चोबे यांनी तहसीलदार, बार्शी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात बोरवेल खोदाईसाठी सध्या प्रतिफूट १०० ते १५० रुपये दर आकारला जात असल्याचे नमूद करून हा दर ६० ते ८० रुपये प्रतिफूट करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच पुढील मागण्याही करण्यात आल्या आहेत.
बोरवेल खोदाईचे दर निश्चित करावेत : शासनाने प्रतिफूट दर निश्चित करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा.
दरपत्रक लावणे बंधनकारक करावे : प्रत्येक बोरवेल गाडीवर निश्चित दराचे फलक लावणे अनिवार्य करावे.
जादा पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करावी : निश्चित दरापेक्षा अधिक पैसे आकारणाऱ्या बोरवेल गाडीमालकांवर दंडात्मक कारवाई करावी.
पावती देणे बंधनकारक करावे : प्रत्येक शेतकऱ्याला कामाची पक्की पावती देण्याची सक्ती करावी. तसेच तालुक्यातील सर्व बोरवेल गाडीमालकांची बैठक घेऊन दर निश्चित करावेत.
कर्जवसुलीला स्थगिती द्यावी : मायक्रो फायनान्स कंपन्या, पतसंस्था, बँका आणि खासगी सावकारांकडून होणारी हप्ता वसुली थांबविण्यासाठी शासनाने आदेश द्यावेत. यापूर्वी आदेश देऊनही वसुली थांबविण्यात आलेली नसल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
शेतकरी आधीच कर्जबाजारी असून पाण्याच्या व्यवस्थेसाठी मोठा आर्थिक खर्च करणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे बोरवेल खोदाईच्या दरांवर प्रशासनाने तातडीने नियंत्रण आणून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बापूसाहेब चोबे यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा ग्राहक संरक्षण अधिकारी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तसेच संबंधित मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
आता प्रशासन या मागण्यांची कितपत दखल घेते आणि बोरवेल खोदाईच्या मनमानी दरांना आळा घालण्यासाठी काय निर्णय घेते, याकडे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण संपर्क : 9405749898 / 9408749898







