स्टार माझा न्यूज परांडा | प्रतिनिधी गोरख देशमाने
दिनांक : १४ ऑगस्ट २०२६
ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप; अवाजवी वीज बिलांबाबत संताप
परंडा शहर व तालुक्यातील वीज ग्राहकांना बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तातडीने काढून त्याऐवजी पूर्वीचे मीटर अथवा साधे डिजिटल मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने एम.एस.ई.बी. परंडा येथील उपकार्यकारी अभियंता एस. एस. पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर एम.एस.ई.बी.चे संबंधित अधिकारी तसेच तहसीलदार, तहसील कार्यालय परंडा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, परंडा शहर व तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या घरातील पूर्वीचे चालू स्थितीतील वीज मीटर कोणतीही लेखी अथवा तोंडी पूर्वकल्पना न देता काढून त्या जागी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. या संदर्भात ग्राहकांच्या अनेक तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्या असून, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
“पूर्वीच्या बिलाच्या तुलनेत आता तिप्पट-चौपट बिल येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ही बिले सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेरची आहेत,” असा आरोप वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून केला आहे. स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबतही ग्राहकांमध्ये संभ्रम व शंका असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
ग्राहकांच्या आर्थिक अडचणी आणि मानसिक त्रासाचा विचार करून ग्राहकांच्या परवानगीशिवाय बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तातडीने काढून पूर्वीचे मीटर किंवा त्याच धर्तीवरील साधे डिजिटल मीटर बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या निवेदनावर तातडीने निर्णय न घेतल्यास सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, फुले-आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष मोहनदादा बनसोडे, मधुकर सुरवसे, तुकाराम चौतमहाल व रविंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण
मो. 9405749898 / 9408749898







