लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत पार
स्टार माझा न्यूज, परांडा (प्रतिनिधी) – दिनांक : 12 जून 2026
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सिरसाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज (दि. 12 जून 2026) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. मंडळ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने ही सोडत पार पडली. यावेळी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून विविध प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
प्रशासक सरपंच, ग्रामसेवक व नागरिकांची उपस्थिती
आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास प्रशासक सरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोडत प्रक्रियेदरम्यान ग्रामस्थांनी आरक्षणाबाबत आपली मतेही अधिकाऱ्यांसमोर मांडली.
रोटेशन पद्धतीने आरक्षण ठेवण्याची मागणी
सोडतीवेळी अनेक ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी आरक्षण हे रोटेशन पद्धतीने ठेवण्यात यावे, अशी मागणी केली. वार्ड क्रमांक 1 मधील आरक्षण वार्ड क्रमांक 2 मध्ये, वार्ड क्रमांक 2 मधील आरक्षण वार्ड क्रमांक 3 मध्ये, वार्ड क्रमांक 3 मधील आरक्षण वार्ड क्रमांक 4 मध्ये आणि वार्ड क्रमांक 4 मधील आरक्षण वार्ड क्रमांक 1 मध्ये अशा पद्धतीने फेरबदल करून रोटेशननुसार आरक्षण निश्चित करावे, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली.
“मला अधिकार नाही” – मंडळ अधिकारी
यावर मंडळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आरक्षणामध्ये अशा प्रकारचा बदल करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. शासनाच्या नियमांनुसार सोडत प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यानुसारच आरक्षण जाहीर करण्यात येत आहे. तसेच कोणाला आरक्षणाबाबत हरकत अथवा आक्षेप असल्यास त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी हरकत सादर करून आपले म्हणणे मांडावे, असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.
प्रभाग क्रमांक 1 चे आरक्षण
प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकूण तीन सदस्य निवडून दिले जाणार असून आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) – 1 जागा
सर्वसाधारण – 1 जागा
सर्वसाधारण (स्त्री) – 1 जागा
प्रभाग क्रमांक 2 चे आरक्षण
प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकूण तीन सदस्यांची निवड होणार असून आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग – 1 जागा
सर्वसाधारण – 1 जागा
सर्वसाधारण (स्त्री) – 1 जागा
प्रभाग क्रमांक 3 चे आरक्षण
प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकूण तीन सदस्य निवडले जाणार असून आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.
सर्वसाधारण – 1 जागा
सर्वसाधारण (स्त्री) – 2 जागा
प्रभाग क्रमांक 4 चे आरक्षण
प्रभाग क्रमांक 4 मध्ये एकूण दोन सदस्यांची निवड होणार असून आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) – 1 जागा
सर्वसाधारण – 1 जागा
निवडणुकीच्या राजकारणाला वेग
आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्याने इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: रियाज पठाण – 9405749898 / 9408749898







