परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा दि. 4 सप्टेंबर 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व शिक्षण महर्षी गुरुवर्य ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि. धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दि1 व 2 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित जिल्हास्तरीय युवक महोत्सवात शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सहा मानाची पारितोषिके पटकावली. युवक महोत्सवात महाविद्यालयाने विविध कला प्रकारांत सहभाग नोंदविला. एकांकिका प्रकारात ‘सपान’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच उत्कृष्ट पुरुष अभिनयासाठी ज्ञानेश्वर भागडे याने प्रथम क्रमांक, तर उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी आदेश बारस्कर याने प्रथम क्रमांक मिळविला. उत्कृष्ट स्त्री अभिनयासाठी कु. दिव्या निंबाळकर हिने द्वितीय क्रमांक, तर कु. दिव्या थोरात हिने तृतीय क्रमांक पटकावला.
याशिवाय ‘आमची शाळा मराठी’ या प्रहसनाला (स्किट) सांघिक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या प्रहसनाचे लेखन महाविद्यालयातील प्रा. संभाजी धनवे यांनी केले होते. प्राथमिक शिक्षण व्यवस्था, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी यांमधील बिघडत चाललेली आहारव्यवस्था या सामाजिक विषयाचे प्रभावी नाट्यीकरण विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केले. या सादरीकरणाला परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली. महाविद्यालयाने युवक महोत्सवात मूक अभिनय, इन्स्टॉलेशन, रांगोळी, वाद-विवाद, वक्तृत्व आदी विविध कला प्रकारांतही सहभाग घेतला. यामध्ये आदेश बारस्कर, ज्ञानेश्वर भागडे, दिव्या निंबाळकर, दिव्या थोरात, निकिता ठोसर, प्रमोद तरंगे, प्रतीक इतापे, कदम रणजीत, प्राची सातपुते, अमृता गवारे, श्रेया इटकर, सानिका गायकवाड, शशांक चंदनशिवे आदी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या युवक महोत्सवासाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रा. संभाजी धनवे, संघप्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे तसेच प्रा. डॉ. निलोफर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ. किरण देशमुख, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. भाऊसाहेब दिवाने यांनी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, युवक महोत्सवातील या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीला आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.







