परंडा (प्रतिनिधी – गोरख देशमाने) : परंडा तहसीलचे तहसिलदार निलेश काकडे यांच्यावर दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ परंडा तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून, तहसिलदार काकडे यांना ४५ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह लेखी निवेदन सादर करण्यात आले.
काय घडले?
निवेदनात नमूद केल्यानुसार, दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता तहसिलदार निलेश काकडे हे अवैध वाळू उत्खननाबाबत प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी जात असताना पिठापूरी (ता. परंडा) येथील रहिवासी योगेश परमेश्वर मेटकरी व त्याच्यासोबत अन्य एक इसम तहसिल कार्यालयाच्या आवारात आले. त्यांनी तहसिलदारांची गाडी अडवून जोरदार आरडाओरडा केला, शिवीगाळ केली तसेच गाडीच्या काचेवर जोरजोरात मार दिला. इतकेच नव्हे, तर जिवे मारण्याची धमकीही दिली. तहसिलदार काकडे यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी अधिकच आक्रमक होऊन त्यांच्या अंगावर धावून गेला.
गुन्हा दाखल
सदर घटनेची नोंद पोलिस ठाणे परंडा येथे गुन्हा म्हणून करण्यात आली आहे.
आरोपीचा पूर्वेतिहास
निवेदनात नमूद केले आहे की, याच आरोपीने सुमारे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी नागटिळक यांच्यावर त्यांच्या कार्यालयातच प्राणघातक हल्ला केला होता. तसेच यापूर्वीही कार्यालयाच्या आवारात येऊन गुंडागर्दी केल्याचे प्रकार घडले आहेत.
कडक कारवाईची मागणी
निवेदनात अशा गुंडप्रवृत्तींच्या इसमांवर प्रशासन व पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर तहसिलदार निलेश काकडे, नायब तहसीलदार पूजा गोरे, नायब तहसीलदार, पेशकार मै. दपवाड, मंडळ अधिकारी पवार यांच्यासह तहसिल कार्यालयाच्या एकूण ४५ कर्मचाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
स्टार माझा न्यूज | संपादक: रियाज पठाण | संपर्क: 9405749898 / 9408749898


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








