स्टार माझा न्यूज
परांडा प्रतिनिधी : गोरख देशमाने
अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल
धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी तालुक्यांसह अनेक भागात विक्रमी पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे, फळबागांचे, घरांचे व जीवनावश्यक साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींची माती वाहून गेली असून शेकडो पशुधन मृत्यूमुखी पडले आहे.
गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत
नद्या, नाले व ओढ्यांना महापूर आल्याने जिल्ह्यातील अनेक गावं व वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. अनेक गावांना पाण्याने वेढा दिल्याने जनजीवन विस्कळीत झालं. वेळेवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे लष्कराचे हेलिकॉप्टर व एनडीआरएफची टीम पाठवून अनेक नागरिकांचा जीव वाचवण्यात आला.

तातडीने मदतीची गरज
या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करत भाजपाचे नेते आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी संपूर्ण धाराशिव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना व नागरिकांना सरसकट मदत देण्याची मागणी केली आहे.
त्याचबरोबर शेतजमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मदत, मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाचे व पाण्यात गेलेल्या घरांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देणे, तसेच घरगुती साहित्यांच्या नुकसानीची भरपाई तातडीने करण्याचीही मागणी ठाकूर यांनी केली आहे.
📝 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.