चार वर्षांपासून स्थानिक प्रशासनात मनमानी कारभार; भ्रष्टाचारविरोधात जनआंदोलन उभं.
मुख्याधिकारींचा कारभार आणि नागरिकांचा रोष
परांडा प्रतिनिधी दि 7 परंडा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती मनीषा वडेपल्ली यांच्यावर गेल्या चार वर्षांपासून मुजोर, मनमानी व भ्रष्टाचारी कारभार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करत प्रशासन चालवले जात असून, नागरिकांना कायद्याच्या नावाखाली वेठीस धरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बदलीस विलंब व चौकशीला वेळकाढूपणा
मुख्याधिकारींची बदली नियमाप्रमाणे तीन वर्षांनंतर होणे आवश्यक आहे. मात्र, वडेपल्ली या चार-साडेचार वर्षांपासून परंडा नगर परिषदेतच कार्यरत आहेत. या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या तक्रारी झाल्या असूनसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकशी समितीचा अहवाल आजपर्यंत सादर झालेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयीचा विश्वास डळमळीत झाला आहे.
शहर बंदची घोषणा व आंदोलनाची हाक
भ्रष्टाचार विरोधी कृती समिती, परंडा तालुका शहराच्या वतीने दिनांक १० जुलै २०२५ रोजी परंडा शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच दिवशी दुपारी २ वाजता तहसील कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा
या आंदोलनाला अनेक राजकीय व सामाजिक संघटनांचा पाठिंबा लाभला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हा प्रमुख रणजीत पाटील, काँग्रेस नेते अॅड. नुरुद्दीन चौधरी, एमआयएमचे तालुका अध्यक्ष जमील खॉ पठाण, राहुल बनसोडे, रमेश परदेशी, अॅड. संदीप पाटील, अॅड. अजय खरसडे, डॉ. अब्बास मुजावर, यांसह अनेक मान्यवरांची स्वाक्षरी असलेले पत्रक पत्रकारांना वितरित करण्यात आले आहे.
भ्रष्टाचाराविरोधात व्यापक जनआंदोलन अपेक्षित
मुख्याधिकारी यांच्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई व्हावी, तसेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे. परंडा शहरातील जनता आता व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याच्या तयारीत असून, हा लढा केवळ एक व्यक्तीविरुद्ध नसून संपूर्ण भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
(स्टार माझा न्यूज)
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










