परंडा, ता. २२ (प्रतिनिधी गोरख देशमाने ) – राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कंडारी (ता. परंडा) येथील थोरले श्री काळभैरवनाथ यांचा वार्षिक याञा उत्सव दि. २० व २१ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे भव्य कुस्ती आखाडा. यामध्ये राज्यातील विविध भागांतील नामवंत मल्लांनी आपली कौशल्ये सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत अंतिम लढत ७१ हजार रुपये रोख बक्षीस व चांदीच्या गदेसाठी झाली. या निर्णायक लढतीत करमाळा येथील बुरुजबंद मल्ल शाहरुख खान याने महाराष्ट्र चँपियन रविंद्र खैरे (अंतरगाव) याला सात डंकी डावांनी चितपट करत ‘भैरवनाथ गदा’ जिंकली.
तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या ८० किलो वजनी गटातील कुस्तीत महाराष्ट्र चँपियन तुषार गोडगे याने संग्राम घोगरे याला आटीतटीच्या लढतीनंतर चितपट करत रोख ५१ हजारांचे बक्षीस व कै. परमेश्वर तिंबोळे स्मृतिचिन्ह गदा पटकावली.

कुस्ती मैदानात एकूण १५० पेक्षा अधिक लहान-मोठ्या कुस्त्या पार पडल्या. या स्पर्धेत अतुल लवटे, शिवयोग पडघण, तेजस मोरजकर, अर्जुन करकुटे, शंभू काळे, मेघराज देशमुख, मारुती शिंदे, विजय काशीद, रणवीर शिंदे, समाधान टकले, शीवराज लोकरे, संतोष तिंबोळे, किसन घोगरे, भैरवनाथ खामकर, करण जाधव, रोहन कोळी, समीर पठाण, लक्ष्मण पाटील, भैय्या मलिक व संतोष सावंत यांसह अनेक मल्लांनी शानदार कामगिरी केली.
महिला मल्ल प्रीती कोळी, सायली सूर्यवंशी, पायल जाधव, अनुश्का शिंदे व प्रतीक्षा काळे यांनीही प्रभावी कुस्त्या सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले. कुस्ती मैदानात हलगीच्या कडकडाटासह पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात खेळाडूंना प्रोत्साहन दिले गेले.

या कार्यक्रमात आजी-माजी मल्लांचा विशेष सत्कार करण्यात आला. कुस्तीसाठी पंच म्हणून दिलीप मोरजकर, आदेश तिंबोळे, बजरंग जाधव, नवनाथ देवकर, श्रीराम गोडगे, ज्ञानेश्वर हुके, सचिन पाटील, बालाजी मिस्कीन, वामन काशीद आदिंनी काम पाहिले. तर समालोचनाची धुरा दिनेश गवळी (बार्शी) व राजा देवकते यांनी समर्थपणे सांभाळली.
या उत्सवात रविवारी दि. २० एप्रिल रोजी रथोत्सव, पालखी मिरवणूक, कावड मिरवणूक, देवास धार, अंबील व शेरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. गुलाल, खोबऱ्याची मुक्त उधळण, मानाच्या कावडींचा नृत्याविष्कार, आणि रात्री १२ वाजता श्री काळभैरवनाथ-जोगेश्वरी विवाह सोहळ्याने उत्सवाची सांगता झाली. मंदिराचे मुख्य पुजारी रमेश पुजारी व श्रीराम पुजारी यांनी विधीवत धार्मिक विधी पार पाडले.
या यशस्वी आयोजनासाठी सलामत शेख, बाळासाहेब पडघण, विशाल देवकर, आदेश तिंबोळे, मुख्याध्यापक सुनील पडघण, हरिभाऊ घोगरे, धनंजय तिंबोळे, अण्णासाहेब महानवर, वामन काशीद, लक्ष्मण तिंबोळे, सारंग घोगरे, नवनाथ तिंबोळे आणि कंडारी गावातील सर्व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898