स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
पिंपरी-चिंचवडच्या कुंदलवाडी परिसरात गेल्या अनेक दशकांपासून स्थायिक असलेल्या व्यावसायिक शेडना अतिक्रमण घोषित करून प्रशासनाने अलीकडेच कारवाई करत ती जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे हजारो लोकांचे रोजगार बुडाले असून, अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. याचा फटका लाखो नागरिकांना बसला असून काही जणांना तीव्र मानसिक धक्का बसल्याने हृदयविकाराचे झटके आल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर, दिनांक १३ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, ते केवळ त्या शेडमध्ये व्यवसाय करत नव्हते, तर अनेकजण तिथेच वास्तव्यास होते. यासंदर्भात न्यायालयाने तीन दिवसांचा अवधी दिल्याचे सांगण्यात येत असले तरी, अजित पवार यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही.
पुनर्वसनाची मागणी
प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे मानवी दृष्टीकोनातून मागणी केली की, या रहिवाशांचे पुनर्वसन त्वरित व्हावे तसेच त्याच जागेवर नव्याने व्यावसायिक शेड उभारण्याची परवानगी द्यावी. सामान्यतः, सरकार जेव्हा कोणतीही जमीन ताब्यात घेते, तेव्हा पर्यायी जागा दिली जाते. मुंबईत २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिले जाते आणि पुनर्वसन केले जाते, त्यामुळे कुंदलवाडीतील रहिवाशांबाबतही अशीच भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, या प्रकरणात प्रशासनाने कोणतीही सहानुभूती न दाखवता अत्यंत घाईघाईने ही कारवाई केली आणि लोकांना त्यांचे साहित्य काढण्याची संधीही दिली नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सकारात्मक भूमिका
यासंदर्भात, अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडून सविस्तर माहिती घेतली आणि लवकरच या प्रकरणावर सखोल चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी मंडळासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आश्वासन दिले की, या संपूर्ण प्रकरणाचा सकारात्मक आणि न्याय्य तोडगा काढण्यासाठी ते स्वतः प्रयत्नशील राहतील.
कुंदलवाडीतील व्यावसायिक शेडवर झालेल्या कारवाईमुळे हजारो लोक संकटात आले आहेत. सरकारने याबाबत तातडीने योग्य उपाययोजना करून प्रभावित कुटुंबांचे पुनर्वसन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. आता या प्रकरणावर प्रशासन आणि सरकार पुढे काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.