www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
धाराशिव (उस्मानाबाद) खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, यांच्या प्रचार सभेत बोलताना मा शरद पवार म्हणाले की
देशाच्या लोकसभेची निवडणूक आली. या निवडणुकीमध्ये जी काही स्थिती आहे देशाची ती तुमच्यापुढे मांडावी या हेतूने आज मी या ठिकाणी आलो. गेले काही दिवस महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात जायचा प्रयत्न माझा आहे. साताऱ्याला गेलो, पुण्याला गेलो, सोलापूर जिल्ह्यात गेलो, जळगाव जिल्ह्यात गेलो, नाशिक जिल्ह्यात गेलो, अहमदनगर जिल्ह्यात गेलो, जालन्यामध्ये गेलो, औरंगाबादला गेलो, परभणीला गेलो आणि आज धाराशिवमध्ये उभा आहे. त्यामुळे एक गोष्ट झाली की सारखं सारखं बोलून माझा घसा बसला. पण घसा बसो किंवा आणखी काही होवो, आज देशासमोरची जी स्थिती आहे त्यामध्ये तुम्ही आणि मी जागे झालो नाही तर अनेक संकटांना अनेक वर्ष तोंड द्यावे लागेल आणि म्हणून मोदी हे देशाचे प्रधानमंत्री त्यांचे नक्की राजकारण, प्रशासन काय आहे? हे तुम्हाला सांगावं या हेतूने मी आता उभा आहे.
आपला देश हा सामान्य लोकांचा देश आहे. लोकांच्या समोर काय संकट आहे? खेड्यापाड्यातील माणूस असो, शहरातील मध्यमवर्गीय असो त्याला विचारलं की तुझ्या पुढची अडचण काय? पहिलं उत्तर येतं, महागाईने त्रासून गेलोय. राज्यकर्ते कोण आहेत? आणि त्यांचे आश्वासन काय होते? हे राज्यकर्ते २०१४ साली सत्तेवर आले. २०१४ ला मत मागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की पेट्रोलचे दर ५० टक्क्यांनी ५० दिवसांमध्ये मी कमी करतो. आज काय झालं? जेव्हा सांगितलं त्यावेळेला पेट्रोलचे दर होते ७१ रुपये ते ७१ रुपये दर लिटरचे ५० दिवसांत कमी करणार होते. आज ३ हजार ६५० दिवस झाले, पेट्रोलचे दर खाली आले का? आज पेट्रोलचा दर एका लिटरला १०६ रुपये झाला. म्हणजे होता ७१, ५० टक्के कमी करण्याचा आश्वासन आणि आता १०६ करून टाकले. पेट्रोल वाढला तर प्रवास महागात पडतो, पेट्रोल वाढलं तर शेतकऱ्यांच्या शेतीचा माल विकायला न्यायचा म्हटलं तर त्याचा बोजा वाढतो. महागाईची ही झळ सामान्य माणसाला अधिक सोसावी लागते.
अनेकांच्या घरांमध्ये आज गॅसचे सिलेंडर आहे, काय किंमत होती? मोदींनी २०१४ ला घरगुती गॅसच्या संबंधीची किंमत ५० टक्के कमी करण्याचं कबूल केलं. त्यावेळेला दर होतं ४३० रुपये एका सिलेंडरला आणि आज तो झाला १ हजार १६७ हा त्यांचा हिशोब. सिलेंडरचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, सामान्य माणसाचे संसार आणि घर चालवणे दिवसेंदिवस अवघड होत चालले.
या देशामध्ये तरुण लोक आहेत आणि त्यांच्या समोरचा सर्वांत मोठा प्रश्न कोणता असेल तर तो बेकारीचा प्रश्न. बेकारीबद्दलची काय स्थिती? जगामध्ये एक संघटना आहे तिचं नाव आय. एल. ओ. (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन) वेगवेगळ्या तरुणांच्या आणि संपूर्ण जगातला ते अभ्यास करतात. त्यांनी असा अहवाल दिला की हिंदुस्थानामध्ये १०० मुलं जर घेतली तर त्यातील ८७ मुलं हे बेकार आहेत. ८७ टक्के तरुणांमध्ये आज बेकारी आहे आणि त्यांना १०० टक्के रोजगार द्यायचा शब्द मोदी साहेबांनी दिला होता, त्यात काही त्यांनी केलं नाही. मग केलं काय त्यांनी?
महाराष्ट्रामध्ये आजच माझ्या कानावर एक गोष्ट आली. मुंबईच्या कृषी बाजार समितीमध्ये निवडून आलेल्या कमिटीच्या लोकांना कुठे काहीतरी आरोप झाले, तर त्याचा एक मुख्य माणूस संजय पानसरे त्याचं नाव, त्यांना आज अटक करून टाकले. त्या मार्केटमध्ये कामगारांचा प्रतिनिधी म्हणून काम करणारे शशिकांत शिंदे नावाचे माजी आमदार आज साताऱ्यामधून लोकसभेचे उमेदवार आहेत, ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नोटिसा दिल्या. निवडणूक चालू असताना लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीला आज नोटिसा देतात, त्यांना अटक करण्याची दमदाटी देतात. त्याचा अर्थ स्वच्छ आहे, सत्तेचा गैरवापर करणे हा एक कलमी काम देशाचे प्रधानमंत्री आज करत आहेत. ते चित्र जर बदलायचे असेल तर या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर यांना मोठ्या मतांनी विजयी करणे हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. या जिल्हा संबंधी माझे अनेक वर्षांचे संबंध पद्मसिंह पाटलांचे होते. आम्ही त्यांना साथ ही दिली, शक्ती दिली कारण धाराशिव हा जिल्हा विकासाच्या संदर्भात पुढे गेला पाहिजे ही मनापासूनची इच्छा होती. पदं दिली, महत्त्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्यानंतर आज मी इथे आल्यापासून ऐकतोय की कोणत्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजकारण चालू आहे, आणि कोणत्या पद्धतीने त्यांनी विकास केला.
आपले उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं भाषण ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की, इथे हॉस्पिटल काढायचा प्रस्ताव होता. तो मान्य केला आणि तो हॉस्पिटल नेला कुठे? नेरळला नवी मुंबईला. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरज भागवण्याची अत्यंत आवश्यकता होती. असे असताना हॉस्पिटलची परवानगी मिळाली आणि ते नव्या मुंबईत नेलं आणि गरिबांसाठी सरकारने दिलेली ही योजना आज नवी मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गासाठी चालवली जाते. याचा अर्थ या धाराशिव जिल्ह्याने शक्ती दिली, मोठं केलं त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा ज्याचा आपला कवडीचा संबंध नाही अशा जिल्ह्यातल्या लोकांना सुविधा देण्यासंबंधीचं काम त्या हॉस्पिटलच्या मार्फत आज त्यांनी त्या ठिकाणी केलं. काही अडलं तर माझ्यासारख्याची अपेक्षा त्यांना अधिक होती. अनेक गोष्टी केल्या. त्यांचे चिरंजीव आमदार नव्हते, आमदार नसताना मंत्री केलं. असं वाटलेलं की ते काहीतरी लोकांसाठी करतील पण आज इथे आल्यानंतर त्यांची एकंदर उद्योग विशेषत: तुळजापूर आणि धाराशिव मध्ये ते बघितल्यानंतर माझ्यासारख्याला सुद्धा धक्का बसला. याला उत्तर एकच आहे, नुसता धक्का बसून चालणार नाही याला उत्तर शोधलं पाहिजे. अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या संपवल्या पण त्यांची पूर्तता झाली नाही आणि त्याला उत्तर काय? उत्तर एकच आहे. उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी मतदान करताना या ठिकाणची जी मशाल आहे, त्याच्या समोरचं बटण दाबणं आणि कितीही संकटे आली तरी या मतदारसंघातील लोकांची साथ कधीही सोडणार नाही, असा लौकिक ज्यांचा आहे, अशा आज ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मोठ्या मतांनी विजयी करन्याची विनंती करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर आमदार कैलास पाटील, ज्येष्ठ नेते श्री.गोरे, राहुल मोहिते, प्रतापसिंह पाटील, संजय दुधगावकर, अशोकराव जगदाळे, धीरज पाटील, संजय निंबाळकर, सक्षणाताई सलगर, अप्पासाहेब पाटील, अविनाश चव्हाण, विश्वास शिंदे, अजित पाटील, संग्राम घाडगे, मुकुंद डोंगरे, अशोक भाऊ मगर, राहुल लोखंडे, डॉ. शहापूरकर आणि अन्य सगळे सहकारी आणि हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.