स्टार माझा न्यूज परंडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने : दि १३ एप्रिल २०२६
प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूह, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मुंढे यांनी आपल्या कार्यकाळात पारदर्शक प्रशासन, शिस्तबद्ध कामकाज आणि जनहिताचे निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. अशा अधिकाऱ्यांची अचानक बदली केल्यास प्रशासनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, तसेच सुरू असलेल्या विकासकामांनाही खीळ बसण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दिव्यांग उद्योग समूहाने आपल्या निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, समाजातील वंचित व दिव्यांग घटकांसाठी कार्य करणारे अधिकारी कायम राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करून तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
निवेदन देताना दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके, महिला जिल्हाध्यक्ष उषा भास्कर पाटील, तालुकाध्यक्ष तानाजी सांगडे, रावसाहेब खरसडे, दादा माने, गणेश जाधव, करीम मुलानी, उत्तरेश्वर जाधव आदींसह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. या वेळी सर्वांनी एकमुखाने बदलीविरोधात भूमिका मांडत शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









