स्टार माझा न्यूज, परांडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने – दिनांक : 14 मार्च 2026
परंडा नगर परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेला कार्यालय अधीक्षक जगदीश सोंडगे, कर्मचारी मुनीर जीकरे तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत विविध प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मागील सभेचा वृत्तांत कायम
सभेच्या सुरुवातीला मागील सभेचा वृत्तांत वाचून तो कायम करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यानंतर सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी नगरपरिषद कार्यालयाला आवश्यक असलेल्या साहित्य पुरवठ्यासाठी निविदा मागवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
विविध विभागांसाठी वार्षिक निविदा काढण्याचा निर्णय
कार्यालयीन भंडार विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, लेखा विभाग तसेच इतर सर्व विभागांसाठी लागणारे साहित्य खरेदी व सेवा पुरवण्यासाठी वार्षिक निविदा काढण्यात याव्यात, तसेच पुढील वर्षात आवश्यकतेनुसार कामे व सेवांसाठी स्वतंत्र निविदा काढाव्यात असा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाचे सुचक रमेश परदेशी तर अनुमोदक सत्तार गुलाब पठाण होते.
बाजार लिलावावर नगरसेवकांची आक्षेपार्ह भूमिका
सन 2026-27 या आर्थिक वर्षात अंतर्गत आठवडी बाजार व दैनंदिन बाजार लिलाव करण्याबाबत ठराव सभेसमोर ठेवण्यात आला. या विषयावर उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, अनिल शिंदे व मन्नान बासले यांनी लिलावधारकांकडून व्यापाऱ्यांकडून मंजूर दरापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याचा आरोप केला. तसेच विक्रेत्यांना जागा मोजून दिली जात नसल्याने त्यांची पिळवणूक होत असल्याचे सांगत बाजाराचा कर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडूनच गोळा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्याधिकाऱ्यांचा अभिप्राय
नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांनी या विषयावर मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांना अभिप्राय देण्यास सांगितले. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले की, नगरपरिषदेकडे बाजार वसुलीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. बाह्य यंत्रणेमार्फत वसुली केल्यास नियंत्रण व अंमलबजावणी करणे कठीण होईल आणि त्यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार वसुली कर्मचाऱ्यांकडून करणे योग्य ठरणार नाही.
आठवडी व दैनंदिन बाजार ठेक्यावर देण्याचा निर्णय
सर्व बाजूंनी चर्चा झाल्यानंतर आठवडी व दैनंदिन बाजाराची वसुली ठेक्याद्वारे करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाचे सुचक चंद्रकांत नाना गायकवाड तर अनुमोदक मन्नाबी मतीन जिनेरी होते.
निवृत्त सफाई कर्मचाऱ्यास लाभ देण्याचा ठराव
सभेत महादेव दगडू ओव्हाळ या निवृत्त सफाई कर्मचाऱ्यास शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभ देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर त्यांना सेवानिवृत्तीचे सर्व लाभ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









