राजेंद्र राऊत यांची तालुक्यात समतोल साधणारी राजकीय रणनीती चर्चेत
स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : 12 मार्च 2026
पंचायत समितीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज
बार्शी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सभापती पदासाठी मीनाक्षी रोंगे तर उपसभापती पदासाठी संतोष निंबाळकर यांनी अधिकृत अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करताना मीनाक्षी रोंगे यांच्या सूचक म्हणून किरण घुले यांनी प्रस्ताव मांडला, तर संतोष निंबाळकर यांच्या सूचक म्हणून शरद बसवंत संतोष यांनी प्रस्ताव सादर केला.
राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली सत्ता बळकट
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यात विविध संस्थांमध्ये पक्षाची सत्ता मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुका आणि शहरातील विविध भागांना प्रतिनिधित्व देत राजकीय, भौगोलिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न राऊत यांनी सातत्याने केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीपासून नगरपरिषदेतही समतोल
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पांगरी भागातील विजय गरड यांना सभापतीपद देण्यात आले, तर उपसभापती पद शेळगाव (आर) येथील बाबा गायकवाड यांना देण्यात आले.
यानंतर बार्शी नगरपरिषद निवडणुकीतही भाजपने मजबूत कामगिरी करत लिंगायत समाजातील तेजस्विनी कथले यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली. उपनगराध्यक्षपदी रोहित पाटील यांची निवड करण्यात आली.
पंचायत समितीतही विविध भागांना प्रतिनिधित्व
आता पंचायत समितीतही उपळाई-ठोंगे भागातील मीनाक्षी रोंगे यांना सभापतीपदासाठी पुढे करण्यात आले आहे. तसेच वैराग भागातील नेते संतोष निंबाळकर यांना उपसभापती पदासाठी संधी देण्यात आली आहे.
यामुळे तालुक्यातील विविध भौगोलिक भागांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
स्वीकृत नगरसेवकांतही संतुलन
दरम्यान, नगरपरिषदेमधील स्वीकृत नगरसेवकांमध्येही संतुलन राखण्यात आले. अलीपुर रोड परिसरातील माने यांना स्वीकृत नगरसेवक करण्यात आले, तर राऊत चाळीतील विजय राऊत यांनाही स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली.
विधान परिषदेसाठी राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा
या सर्व घडामोडींमुळे बार्शी तालुका व शहरातील विविध विभागांमध्ये पदांचे वाटप करत राजकीय समतोल साधण्यात राजेंद्र राऊत यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
पुढील काळात जिल्हा परिषदेत बार्शी तालुक्याला सभापती पदाची संधी मिळणार का, तसेच भारतीय जनता पार्टीचा पुढील राजकीय निर्णय काय असेल आणि राजेंद्र राऊत यांना विधान परिषद सदस्यत्वाची संधी मिळणार का, याकडे आता बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









