शिंदे गटाच्या संख्याबळावर सभापतीपदाची बाजी; उपसभापतीपदी परसु गवारे
स्टार माझा न्यूज, परंडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने – दिनांक : ७ मार्च २०२६
सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाची सत्ता
परंडा तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची समजली जाणारी पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत हल्ली (अवारपिंपरी) येथील रहिवासी व वडनेर गणातून निवडून आलेल्या आर्चनाताई अण्णासाहेब जाधव यांची सभापतीपदी निवड झाली. तर उपसभापतीपदी परसु गवारे यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी तालुक्यातील राजकारणावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जाधव कुटुंबाला मिळाला मोठा मान
आर्चनाताई जाधव या शिवसेना (शिंदे गट) चे तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव यांच्या पत्नी आहेत. अण्णासाहेब जाधव हे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे सभापती पद जाधव कुटुंबाकडे गेल्याने सावंत समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष; पंचायत समिती परिसर घोषणांनी दणाणला
सभापती पदाची निवड जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. घोषणा देत कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसर दणाणून सोडला. आर्चनाताई जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. पंचायत समितीसमोर कार्यकर्त्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती. अनेकांनी फटाके फोडून आणि घोषणा देत आनंद व्यक्त केला. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पंचायत समितीतील पक्षीय गणित
परंडा पंचायत समितीतील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना (शिंदे गट) यांचे ६ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ सदस्य, भारतीय जनता पक्षाचा १ सदस्य आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा १ सदस्य असे चित्र आहे. या संख्याबळाच्या जोरावर सभापतीपदावर शिंदे गटाने सहज विजय मिळवला.

सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका
सभापती म्हणून निवड झाल्यानंतर आर्चनाताई जाधव यांनी सर्व सदस्य व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. माजी मंत्री आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पती तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव यांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासाच्या अपेक्षा वाढल्या
नवीन सभापती निवडीनंतर परंडा तालुक्यातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, शेती आणि मूलभूत सुविधांवर पंचायत समितीकडून आता ठोस निर्णय होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









