एसटीच्या नव्या ५५ आसनी बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ नाव; मार्चपासून राज्यभर सेवा सुरू
स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) गोरख देशमाने – दिनांक : ०८ फेब्रुवारी २०२६
मुंबई :
स्वराज्याच्या जननीचा गौरव
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) नव्या ५५ आसनी अत्याधुनिक बसेसना हिंदवी स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला ज्यांनी संस्कार, दिशा आणि बळ दिले, त्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ही सेवा सुरू करणे म्हणजे इतिहासाचा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मार्चपासून टप्प्याटप्प्याने सेवा
या नव्या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर सेवेत दाखल होणार आहेत. भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती आणि अभिमानाचे प्रतीक ठरणार आहेत.
शिवरायांच्या प्रेरणाशक्तीचे स्मरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेमागील प्रेरणाशक्ती म्हणून राजमाता जिजाऊ यांचे स्मरण कायम राहावे, या उद्देशाने हे नामकरण करण्यात आले आहे. यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी एसटी बसेस ओळखल्या जातात. त्याच गौरवशाली परंपरेत आता राजमाता जिजाऊ या नावाची भर पडली आहे.
प्रवाशांसाठी अधिक आरामदायी प्रवास
सध्याच्या साधारण ४० आसनी बसेसच्या तुलनेत नव्या बसेसमध्ये ५५ प्रवाशांसाठी आसन व्यवस्था असणार आहे. त्यामुळे गर्दीच्या मार्गांवर उभ्या प्रवाशांची संख्या कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी होणार आहे. विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर या बसेस धावणार आहेत.
मातृशक्ती आणि आधुनिकतेचा संगम
“राजमाता जिजाऊ” हे नाव स्वराज्याचे संस्कार, मातृशक्तीची प्रेरणा आणि प्रवाशांच्या सोयीसाठीची बांधिलकी दर्शवते. इतिहासाच्या साक्षीने सजलेल्या या आधुनिक बसेस लवकरच महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावणार आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









