“दादा नॉट रीचेबल…” ते “दादा कायमचे हरवले…”
बारामतीचा वाघ, महाराष्ट्राचा आधार, शाहू–फुले–आंबेडकरांचा वारसा जपणारा शेवटचा टेकू
स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : 29 जानेवारी 2026
बारामती–महाराष्ट्र :
राजकारणात कधी फोन लागत नसेल, भेट मिळत नसेल, तर एकच वाक्य कानावर यायचं— “अजित दादा नॉट रीचेबल आहेत!”

तेव्हा राज्यभर खळबळ उडायची. आज मात्र तेच शब्द मनात रुततात— दादा कायमचे हरवले…
हक्काचा दादा, लाडका दादा, कामाचा वाघ—आज आठवणीत उरतोय.

पहाटेचा शपथविधी : धाडसाची सही
अजित दादांचा पहाटेचा शपथविधी लोकांच्या डोळ्यासमोर आजही जिवंत आहे.
“अजित दादा म्हणजे निर्णय आणि वेग”—हे त्या पहाटे सिद्ध झालं.
अंधारात घेतलेला निर्णय, उजेडात उमटलेला प्रभाव—राजकारणाला वेग देणारा तो क्षण इतिहासात कोरला गेला.
गाजलेले किस्से : ओरड कामासाठी, माया माणसासाठी
सभा उशिरा सुरू झाली तर दादांची नजरच पुरेशी असायची.
अधिकारी असो वा कार्यकर्ता—शिस्त मोडली तर ओरड ठरलेली.
पण तोच कार्यकर्ता अडचणीत सापडला, तर दादा स्वतः फोन करून विचारायचे— “काय अडलंय, सांग.”
ओरड कामासाठी, प्रेम माणसासाठी—हा दादांचा स्वभाव.
“दादा आय लव्ह यू” म्हणणाऱ्याला हसत “आय लव्ह यू टू”—वरून “बायकोला जाऊन म्हण, ती म्हणेल गडी कसा काय बिघडला” अशी कोपरखळी.
हातावर मुका घेणाऱ्याला— “च्यायला, बायकोनं एवढं प्रेमानं किस केलं नसेल”—अशी मिश्किल टिपणी.
पत्रकारांच्या अतरंगी प्रश्नांना तितकीच अतरंगी उत्तरं— “मी काय तुला म्हातारा वाटलो का?”
आणि मध्येच “ओ दादा ओ दादा” करणाऱ्याला— “गप रे दादा पादा, बस तू खाली. मिश्किलपणे सांगणारे दादा काळाच्या पडद्याआड गेले

(आणि हो—हे डायलॉग तुम्ही आत्ता त्यांच्याच टोनमध्ये वाचले असतील. खरं ना? दॅट्स अजित पवार!)
स्वच्छता, वेळ आणि काम : दादांची ओळख
दादा स्वच्छतेचे कट्टर.
वेळ म्हणजे शिस्त—सभा, बैठक, दौरे—उशीर नको, ढिलाई नको.
कारण दादांसाठी वेळ पाळणं म्हणजे सामान्य माणसाचा सन्मान.
बारामतीचा विकास, महाराष्ट्राची ताकद
बारामतीसाठी दादा म्हणजे रस्ता–पाणी–शेती–शिक्षण यांची हमी.
संपूर्ण महाराष्ट्रासाठी ते कठोर प्रशासक आणि कामाचा नेता.
गावखेड्यातील कार्यकर्त्यांना त्यांनी कधी परकं केलं नाही— “हा माझा माणूस” ही भावना प्रत्येक निर्णयात दिसायची.
शाहू–फुले–आंबेडकरांचा वारसा : शेवटचा टेकू
सामाजिक न्याय, समानता आणि शोषितांचा आवाज—शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार दादांनी कृतीत जपला.
म्हणूनच आज गावोगावी हळहळ ऐकू येते— वारसा जपणारा शेवटचा टेकू ढळला.

क्लॅरिटीचा नेता : ‘शुगर-कोटेड’ नाही, थेटपणा
राजकारणात तडजोडी असतात—पण का आणि कशासाठी याची दादांकडे प्रचंड क्लॅरिटी होती.
“सत्तेशिवाय लोकांची कामं होत नाहीत; सत्ता हवीच”—हा थेट विचार.
गोडगोड भाषणं नाहीत; नो नॉन्सेन्स भूमिका.
धक्कातंत्र : शेवटपर्यंत वेग
पहाटेचा शपथविधी असो, अचानक ‘नॉट रीचेबल’ होणं असो—धक्कातंत्र त्यांनी कधी सोडलं नाही.
जाताजाता धक्का नाही तर महाराष्ट्राला शॉक देणारी आठवण उरली.

‘शापित उपमुख्यमंत्री’ : इच्छा, खंत आणि वास्तव
कॅलिबर, क्षमता असूनही मुख्यमंत्रीपदाची इच्छा कधी कधी खंत बनून बाहेर यायची.
कायम उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागणं—अनेकांच्या मते तोच शाप.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार—दोघेही प्रशासकीय पकडीत मातब्बर;
म्हणूनच दादांची उणीव प्रशासनाला अधिक जाणवते.
पवार राजकारणाचा ‘राजा’
राजकारण बुद्धिबळासारखं—वजीर, घोडे असू देत; राजा नसला तर खेळ थांबतो.
प. महाराष्ट्रातील साखर पट्टा, सहकार, कृषी, शिक्षण—ही इको-सिस्टम राजाच्या भूमिकेशिवाय पोरकी वाटते.
दादांनंतर कुठे पोकळी निर्माण झालीय—ते कळायला वेळ लागेल; पण ती मोठी आहे.
शेवटचा शब्द
दिलदार, रांगडा, प्रशासनावर मांड ठोकणारा कमांडर;
वेळ पडली तर गुरु–काकांनाही थेट प्रश्न विचारणारा—असा ‘दादा’ दुसरा नाही.
साहेब खूप झाले; आपलेपणाने कान ओढणारा ‘दादा’ एकच.
दादा, तुम्ही सदैव कुतूहल राहाल.
देव तुमच्या गतात्म्यास शांती देवो, आणि कुटुंबीय–कार्यकर्त्यांना बळ देवो.
We love you, Dada. You will be missed.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









