बार्शी प्रतिनिधी दिनांक 25 : 1999 सालच्या दहावी ‘अ’च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. मार्च 1999 मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर सर्वांनी आपापल्या दिशेने मार्गक्रमण केले. त्या प्रवासात अनेकांनी यश, संघर्ष आणि चढउतार अनुभवले; पण आज 25 वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात भेटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो क्षण शब्दात व्यक्त करणे प्रत्येकासाठी अवघड होते.
धकाधकीच्या आयुष्यात सर्वजण आपल्या कामात व्यस्त असले तरी शाळेच्या आठवणी कायम मनात असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.
या वेळी मुख्याध्यापक चाटी सर यांनी मनोगतात सांगितले की, “सर्व माजी विद्यार्थी निरोगी राहा, एकमेकांच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडा. आता तुम्ही सर्व पालकाच्या भूमिकेत आहात आणि तुमची जबाबदारी वाढली आहे. समाजाच्या सर्व स्तरात यशस्वी विद्यार्थी हीच सिल्व्हरची खरी ओळख आहे,” असे ते म्हणाले.
दहावी ‘अ’च्या बॅचमधील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वबळावर उद्योग उभे केले, तर काहीजण राजकारणातही पुढे गेले आहेत. याच बॅचमधील सुवर्णा मुंडे या कळंब नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा तर राजश्री माळगे या बार्शी नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. काहीजणी शिक्षक, तर काही गृहिणी असून सर्वगुणसंपन्न माजी विद्यार्थ्यांचा हा मेळावा दिवाळीच्या आनंद पर्वणीसारखा ठरला.
25 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेतील गमती-जमती, शिक्षकांच्या शिक्षा, जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांसोबत क्षण साजरे केले.
या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे, माजी मुख्याध्यापक एस. एम. गणाचार्य, तळे सर, निबंर्गी सर, अनुराधा शिलवंत, जाधवर सर, मेनकुदळे सर, विश्वास चौधरी सर यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे समाजातील योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
या मेळाव्यास दहावी ‘अ’च्या बॅचचे सुमारे 50 विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात वेगळी छाप उमटवली असून, त्यांचा अभिमान असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते. गीत-संगीत, नाट्यछटा, मिमिक्री, विनोदी केबीसी, डायलॉग आणि नृत्य सादरीकरणांमुळे वातावरण रंगतदार झाले. जुन्या काळातील प्रसंग आणि शिक्षकांच्या आठवणींनी सर्वांना पुन्हा 25 वर्षांपूर्वीच्या काळात नेले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता देव यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाम थोरात यांनी मानले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









