परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा 04 ऑक्टोबर 2025
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील लाखी गावात आलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे जगणे विस्कळीत झाले. घरातील चूल विझली, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हतबलतेची छाया दिसू लागली.
या कठीण प्रसंगी DAGA Foundation, दापोली (माजी विद्यार्थी, दापोली कृषी विद्यापीठ) यांनी गावकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला. पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळावा म्हणून तांदूळ, डाळी, पीठ, मसाले, साखर, मीठ आणि इतर जीवनावश्यक साहित्य असलेली किराणा किट वाटप करण्यात आली.
या मदत उपक्रमामध्ये DAGA Foundation चे सदस्य विजय वाघमारे, सुनील थोरबोले, नागेश पाटील आणि बालाजी देशमुख स्वतः उपस्थित राहून संपूर्ण वितरण प्रक्रिया शिस्तबद्ध आणि मनापासून पार पाडली.
गावकऱ्यांनी या मदतीचा मनःपूर्वक स्वीकार केला. काहींच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तर काहींच्या चेहऱ्यावर नव्याने आशेचा प्रकाश झळकत होता. “आपल्या अडचणीच्या काळात ही मदत देवदूतासारखी आली”, असे गावकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.
संकटाच्या क्षणी दिलासा देणारा हा उपक्रम केवळ मदत नसून माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरला आहे. DAGA Foundation च्या या कार्यामुळे लाखी गावातील गरजू कुटुंबांना नव्या धीराची आणि आशेची ताकद मिळाली आहे.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.