ऐतिहासिक शिवमंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी
परंडा, ता.१९ (गोरख देशमाने)
शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील शिवमंदिरात श्रावणमासानिमित्त सोमवार, दि.१८ रोजी याञाउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
धार्मिक कार्यक्रमांची मालिका
याञाउत्सवानिमित्त रविवारी (ता.१७) व सोमवारी (ता.१८) शिवमंदीर सेवा मंडळाच्या वतीने हरिजागर, किर्तन व प्रवचन यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सोमवारी पहाटे ६ वाजता श्रींच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात आला. सकाळी १० ते ११ या वेळेत किर्तनकार बालाजी बोराडे यांनी भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले.

पावसातही शिवभक्तांची श्रद्धा कायम
मागील दोन दिवसांपासून संततधार सुरु असून सोमवारीही रिमझिम पाऊस चालूच होता. मात्र पावसाची पर्वा न करता भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. महिला भक्तांचा सहभाग लक्षणीय होता. मंदिर परिसरात आकर्षक फुलांची आरास व भव्य मंडप उभारण्यात आला होता.
ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक
दुपारी १२ ते ३ या वेळेत शिवमूर्तीची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. सुशोभित ट्रॅक्टर-ट्रॉलीतून मूर्तीची शोभायात्रा नेण्यात आली. ढोल-ताशा, टाळ-मृदंग, हलगी, पारंपारिक सनई-चौघडा, वारकरी संप्रदायाचा गजर व आतषबाजी हे आकर्षण ठरले.
महाआरती व महाप्रसाद
मिरवणुकीनंतर शिवमंदिरात महाआरती झाली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नगरपालिकेच्या वतीने मंदिर परिसराची स्वच्छता करून परिसर सजविण्यात आला होता.
तरुणांचा उत्साही सहभाग
या याञाउत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवमंदिर सेवा मंडळाचे पुजारी राजाभाऊ गिराम, दगडु जाधव, कल्याण माने, अंकुश माने, दत्ताञय मेहेर, दत्तामहाराज रणभोर, रणजीत रोहिटे, धनाजी जाधव, महादेव माने, अतुल माने, ईश्वर जाधव, वसंत माने, बिभिषण माने, कुंदन जाधव, पोपट जाधव यांसह अनेक तरुणांनी पुढाकार घेतला.
📞 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.