Apple च्या ऑपरेशन्सची धुरा भारतीयाच्या हाती – एक ऐतिहासिक क्षण
📍 टेक विश्वात भारतीयांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी! जगातील सर्वात प्रतिष्ठित टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या Apple Inc. ने भारतीय वंशाचे सबीह खान यांची मुख्य ऑपरेशन्स अधिकारी (COO) पदावर नियुक्ती जाहीर केली आहे. हे पद ते या महिन्याच्या अखेरीस स्वीकारणार असून, सध्याचे COO जेफ विलियम्स हे 2025 च्या अखेरीस निवृत्त होत आहेत. ही निवड फक्त जबाबदारीची नाही, तर तीन दशके Apple सोबत काम केलेल्या सबीह खान यांच्या निष्ठा, नेतृत्वक्षमता व दूरदृष्टीवरची कंपनीची शिक्कामोर्तब आहे.
कोण आहेत सबीह खान?
सबीह खान यांचा जन्म साल 1966 मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. लहान वयातच त्यांचे कुटुंब सिंगापूर येथे स्थलांतरित झाले आणि काही वर्षांनंतर अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांनी टफ्ट्स युनिव्हर्सिटी येथून इकोनॉमिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये दुहेरी पदवी घेतली. त्यानंतर रेंससेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, न्यूयॉर्क येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स पूर्ण केली.
Apple सोबतचा तीन दशकांचा प्रवास
सबीह खान यांनी १९९५ साली Apple मध्ये प्रवेश केला आणि तब्बल ३० वर्षे विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिले. सध्या ते कंपनीत ऑपरेशन्सचे सीनियर वाइस प्रेसिडेंट म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांनी Apple च्या ग्लोबल सप्लाय चेन तयार करण्यात आणि टिकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. उत्पादन, लॉजिस्टिक्स, पर्यावरणीय धोरणं व गुणवत्तेच्या व्यवस्थापनात त्यांच्या योगदानामुळे Apple चे उत्पादन व्यवस्थापन जगात आदर्श मानले जाते.
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण
सबीह खान यांची ही नेमणूक केवळ एक व्यावसायिक यश नाही, तर जगभरातील भारतीय वंशाच्या तंत्रज्ञ आणि व्यावसायिकांसाठी प्रेरणास्थान आहे. भारतीय मूळ असलेला एक व्यक्ती आज जागतिक तंत्रज्ञान उद्योगाच्या सर्वोच्च नेतृत्वात पोहोचत आहे, ही बाब भारतातील युवकांना नव्या स्वप्नांची दिशा दाखवणारी आहे.
भारताची जागतिक पातळीवर ठसठशीत उपस्थिती
Apple सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये COO सारखे महत्त्वाचे पद भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळणे, हे स्पष्टपणे दर्शवते की भारतीय प्रतिभा, शिक्षण आणि कष्ट जगभरात मान्यता मिळवत आहे. सबीह खान यांचा प्रवास ही केवळ यशोगाथा नसून, ती मेहनतीची, संधीच्या शोधाची आणि निष्ठेची कहाणी आहे.
📢 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.