परंडा, ता. २२ (प्रतिनिधी गोरख देशमाने) – राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सोनारी (ता. परंडा) येथील श्री काळभैरवनाथ-जोगेश्वरी मातेचा विवाहसोहळा रविवार, २० एप्रिल रोजी रात्री १२ वाजता प्रथा व परंपरेनुसार मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी अक्षता टाकण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
श्री काळभैरवनाथ-जोगेश्वरी मातेस चैत्र शुद्ध अष्टमीस (ता. ६ एप्रिल) हळद लावण्यात आली होती. यंदाचा चैत्र यात्रोत्सव नक्षीदार कलाकुसरीच्या नवीन रथासह जल्लोषात साजरा होत आहे. यामुळे संपूर्ण सोनारी नगरीत उत्सवाचे वातावरण आहे. महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक सोनारीत दाखल होत आहेत. रथोत्सव २६ एप्रिल रोजी साजरा होणार आहे.
विवाह विधी पुजारी संजय महाराज, समीर पुजारी व मंदिराचे विश्वस्त मयुर पुजारी यांनी पार पाडले. सुरुवातीला तेलवण गीत गायन झाले. उपस्थित भाविकांना हळद वाटून देवास हळद लावण्यात आली. देवास गरम पाण्याने स्नान घालून मानाचे वस्त्र परिधान करीत मंदिरात वाजत-गाजत आणले. धुपारती, एकारतीनंतर उपाध्याय अॅड. विवेक काळे यांनी अंतरपाट धरला व विश्वस्त मयुर पुजारी यांनी मंगलाष्टके गाऊन रात्री १२ वाजता लग्नसोहळा पार पडला.

परंडा शहरातील परदेशी परिवारातर्फे देवास मानाचा पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नाथांची महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. या वेळी संजय पुजारी, अॅड. विवेक काळे, विक्रम पाटील, पिंटू देशमुख, निलेश देशमुख, बापू पाटील, उपसरपंच परमेश्वर मांडवे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सेवेकरी व पुजारी समीर पुजारी यांनी अक्षता वाटप केले. ढोल-ताशांच्या गजरात जयघोष करण्यात आला.
या यात्रेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरामेठ, तहसीलदार निलेश काकडे यांनी आढावा बैठक घेऊन संबंधित विभागांना सुचना दिल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, स्वच्छतेची कामे, सीसीटीव्ही कॅमेरे यांसह नियोजन करण्यात आले आहे.
संपादक: रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.