उपजिल्हा रुग्णालयावर प्रश्नचिन्ह! डॉक्टर गायब, रुग्ण त्रस्त!

Picture of starmazanews

starmazanews

प्रतिनिधी / गोरख देशमाने, परंडा, दि. २१ एप्रिल
परंडा तालुक्यात सध्या उन्हाचा तीव्रतेने पारा वाढत असून, त्यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये आजारपणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने आरोग्य सेवा द्यावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेने वैद्यकीय अधीक्षक डॉ. विश्वेश कुलकर्णी यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.

पत्रकार संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या तापमानामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास होतो आहे. मात्र उपजिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर रुग्णांची नीट तपासणी करत नाहीत. केवळ कागदावर औषधे लिहून देण्यात येतात. हीच मंडळी आपल्या खासगी दवाखान्यात प्राथमिक तपासणी पूर्ण करतात, पण रुग्णालयात तीच सेवा देण्यास टाळाटाळ करतात. हा दुजाभाव योग्य नाही, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाहीत आणि वेळेआधीच निघून जातात, त्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. नवविवाहित वधू-वरांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची सुविधा रुग्णालयात सुरू असली तरी, कागदपत्रांच्या अटीमुळे अनेक जोडप्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. तसेच, रुग्णांना इतर ठिकाणी रेफर करण्याचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, तालुकाध्यक्ष मुजीब काझी, तालुका कार्याध्यक्ष प्रमोद वेदपाठक, सचिव तानाजी घोडके, फारुख शेख, विजय मेहर, समीर ओव्हाळ, रावसाहेब गायकवाड, धनंजय गोफणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


वैद्यकीय अधीक्षकांचा तत्पर प्रतिसाद

पत्रकार संघटनेच्या निवेदनानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. विश्वेश कुलकर्णी यांनी पत्रकारांसमक्ष उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी काही डॉक्टर व कर्मचारी आपापल्या नेमून दिलेल्या जागी अनुपस्थित असल्याचे आढळले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात येईल, असे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.



संपादक: रियाज पठाण | संपर्क: 9405749898 / 9408749898
स्टार माझा न्यूज, बार्शी

Recent Posts
error: Content is protected !!