स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा तालुक्यात सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर – राजकारण तापलं! गावपातळीवर ‘सत्तेच्या खेळीला’ सुरुवात, सर्व पक्ष मैदानात उतरले!
प्रतिनिधी – परंडा
राजकारण म्हणजे नुसतं विधानसभेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, आता गावपातळीवरही ‘सत्ता’ आणि ‘सत्तेची गणितं’ जोरात दिसून येत आहेत. परंडा तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत आज (१६ एप्रिल २०२५) बुधवार रोजी तहसील कार्यालय परंडा येथे पार पडली. उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निलेश काकडे व नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
आता खरी रणधुमाळी सुरु होणार!
आरक्षण जाहीर होताच, भावी सरपंचांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे. प्रचाराचं रणशिंग फुंकण्यात आलंय आणि गावपातळीवर आता सत्तेचा ‘खेळ’ तापतोय.
गावागावात ‘आपण असे करू, तसे करू’, विकासाचे मोठे दावे, आणि आश्वासनांचा पाऊस पडू लागलाय.
पक्षांची ताकद आजमावणार…
या निवडणुकीत भाजप, शरद पवार गटाची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे गटाची शिवसेना, शिंदे गट, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, आणि अनेक अपक्ष उमेदवार सुद्धा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

आरक्षणाच्या या प्रक्रियेनंतर गावागावांत राजकीय खलबते रंगू लागली आहेत. गावातील मतदार कोणाला तारणार आणि कोणाला पाडणार, कोणावर कुरघोड्या होतील आणि कोण नवे समीकरण तयार करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“गाव गाठा – माणसं सांधा” हे सूत्र केंद्रस्थानी ठेवत प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवर आपली मुळे घट्ट करायला बघतोय. भाजप आणि शिंदे गट युतीचा जोर, शरद पवार गटाची परंपरागत पकड, अजित पवार गटाची विकासविषयक भुमिका, ठाकरे सेनेची सहानुभूती लाट, मनसेचा आक्रमक पवित्रा, काँग्रेसची जुनी मुळे आणि वंचित आघाडीचा प्रभावी शिरकाव – हे सारे रंग परंडा तालुक्यातील राजकीय चित्राला अधिकच रंगतदार बनवत आहेत.
सर्वसामान्य मतदाराच्या मनात मात्र एकच प्रश्न – खऱ्या अर्थाने गावासाठी काम कोण करणार?
आगामी दिवसांत गटतट, मांडवली, उमेदवारीचे तिकीट वाटप, अंतर्गत बंडखोरी आणि मतांचे समीकरणं यावरच या निवडणुकीची दिशा अवलंबून राहणार आहे.
राजकारण, विकास, सामाजिक समीकरणं आणि वैयक्तिक वर्चस्व या साऱ्यांचा मेळ साधत परंडा तालुक्यात सरपंच निवडणूक एक रोचक पर्व ठरणार आहे.
गावपातळीवरची ही राजकीय रणधुमाळी आता दिवसेंदिवस अधिक तीव्र होणार हे निश्चित!
– संपादक : रियाज पठाण
संपर्क : 9405749898 / 9408749898
स्टार माझा न्यूज, परंडा
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








