शिक्षण कोमात, दारू जोमात! सरकारचं भविष्यदृष्टी कुठं आहे?
दारू पिणाऱ्यांसाठी ‘समिती’, पण विद्यार्थ्यांसाठी ‘संवेदना’ही नाही!
बार्शी (प्रतिनिधी) – राज्यात बिअर पिणाऱ्यांची संख्या कमी झाली, महसूल घसरला… आणि सरकार जागं झालं! तात्काळ एक समिती नेमली गेली – कशी वाढवायची बिअरची विक्री, कसा भरायचा तुटलेला महसूल! पण ज्या राज्यात शाळांमध्ये मुले कमी होत आहेत, पटसंख्या घसरतेय, मराठी शाळा बंद होत आहेत – तिथे सरकारचं मौन कोणाला बोलकं वाटत नाही का?
दारूपासून मिळणारा पैसा महत्त्वाचा वाटतो, पण शिक्षण देणाऱ्या शाळा मात्र खर्चिक वाटतात? हे धोरण शिक्षणप्रिय महाराष्ट्राला शोभतं का?
राज्य शासनाने नुकतीच बिअर विक्री वाढवण्यासाठी एक विशेष समिती नेमली आहे. या समितीचा उद्देश म्हणजे बिअर पिणाऱ्यांची संख्या वाढवून महसूलात वाढ करणे. हे ऐकून सामान्य माणसाला धक्का बसल्याशिवाय राहत नाही.
दुसरीकडे, अनेक गावांमध्ये मराठी शाळा बंद पडत आहेत. शिक्षक नसतात, विद्यार्थी नसतात, म्हणून शाळा बंद केल्या जातात. पण त्यासाठी कोणती समिती नाही, कोणती चर्चा नाही, कोणती चिंता नाही!

शिक्षण हे भविष्याचं भांडार असताना, दारूचं विक्रीतून अर्थकारण सावरणं हे समाजासाठी घातक नाही का?
शिक्षण तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक पालकांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. “बिअरसाठी समिती असेल, तर शाळांसाठी काय – उदासीनता?” असा सवाल आता जनतेच्या मनात गडद होत आहे.
सरकारने शिक्षण क्षेत्रालाही तितक्याच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा, ‘दारूदार’ भविष्य घडेल, पण सुशिक्षित समाज मात्र हरवून बसेल!

“दारूला समिती, शाळांना संमती?”
“दारू पिणारे कमी झाले,
शासनाला चिंता लागली!
दारूचा महसूल कमी झाला,
आणि तात्काळ समिती नेमली गेली!
…पण मराठी शाळा?
तिथं विद्यार्थी कमी झाले,
तर शाळाच बंद केली जाते!
दारूसाठी उपाय,
पण शिक्षणासाठी उपेक्षा?
दारू विकली जाते,
पिढ्या मात्र हरवतात…
शासनाला महसूल हवा,
पण समाजाचं भविष्य नको?
शिक्षण वाचवा!
शाळा वाचवा!
मुलांचं भविष्य वाचवा!
दारूला समिती असेल,
तर शाळांसाठीही संमती द्या!”

रियाज पठाण, संपादक – स्टार माझा न्यूज 9405749898 // 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.