स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
परंडा (धाराशिव): परंडा तालुक्यातील महा ई सेवा केंद्रांच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. सिटी सर्व्हेच्या नक्कल उताऱ्यासाठी अवैधपणे 100 ते 150 रुपये आकारले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. शासनाने ठरवून दिलेले दर बाजूला ठेवत काही केंद्रांनी ही लूट सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमी अभिलेख विभागाकडून सध्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नक्कल/उतारे देण्याची सेवा बंद आहे. हीच बाब महा ई सेवा केंद्राकडून नागरिकांना सांगितली जात असून, त्याचा गैरफायदा घेत अत्यधिक दर आकारले जात आहेत. एका नोंदणीकृत दस्ताऐवजाची प्रत देण्यासाठी केवळ 10 ते 20 रुपये आकारण्याचा शासन नियम असताना, प्रत्यक्षात 100 ते 150 रुपये आकारले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
यासंदर्भात भूमी अभिलेख अधीक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “शासनाने आमच्याकडून नक्कल देण्याची सेवा बंद केली आहे, त्यामुळे नागरिक महा ई सेवा केंद्रांकडे जात आहेत.” मात्र या सेवाकेंद्रांवर कोणताही योग्य दरनिश्चितीचा फलक लावलेला नसल्याने सामान्य माणसांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांची मागणी:
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून भूमी अभिलेख कार्यालयातून पुन्हा एकदा नक्कल/उतारे देण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, तसेच महा ई सेवा केंद्रांवर दर सूची लावण्याचे बंधनकारक करावे. अन्यथा महा ई सेवा केंद्रांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ही स्थिती केवळ परंड्यापुरती मर्यादित नसून, इतरही तालुक्यांमध्ये असे प्रकार घडत असल्यास त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या मूलभूत सेवांवर असा अन्याय होणे दुर्दैवी असून, संबंधित प्रशासनाने याची तात्काळ दखल घेणे अत्यावश्यक झाले आहे.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.