बार्शीतील नागरिकांची लूट थांबवा! रेशन कार्ड एक नाव ऑनलाईन करण्यासाठी ३००-५०० रुपये वसुलीचा प्रकार.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
बार्शी (प्रतिनिधी):
रेशन कार्ड ऑनलाईन करण्याच्या नावाखाली बार्शी शहर व तालुक्यातील अनेक महा-ई-सेवा केंद्रांकडून नागरिकांकडून अनधिकृत आणि अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. एका नावासाठी तब्बल ३५० ते ५०० रुपये घेतले जात असून, यामुळे सामान्य व गरजू नागरिकांची मोठी आर्थिक लूट होत आहे.
तहसील कार्यालयाची सूचना – पण जमेल कशी?
तहसील कार्यालयाकडून नागरिकांना सांगण्यात येते की, त्यांनी पब्लिक लॉगिनद्वारे स्वतःच ऑनलाईन अर्ज करावा. मात्र, अनेक नागरिक हे अशिक्षित किंवा तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्याने, त्यांना ही प्रक्रिया समजणे आणि पूर्ण करणे अवघड जाते. मोबाईलवरून अर्ज करण्याचा प्रयत्न केला तरी, प्रक्रिया किचकट व गुंतागुंतीची असल्याने ती पूर्ण करता येत नाही.
याचा गैरफायदा घेत महा-ई-सेवा केंद्रांची मनमानी सुरूच आहे.
नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेत काही सेवा केंद्र चालक मनमानी दर आकारून त्यांच्या अडचणींचे सोने करत आहेत. कोणतेही अधिकृत दरपत्रक नसताना एका नावासाठी ३००-५०० रुपये घेतले जात असून, ही रक्कम सर्वसामान्यांसाठी मोठी आहे.
नागरिकांची मागणी – उपाययोजना करा!
नागरिकांकडून खालील मागण्या सातत्याने करण्यात येत आहेत:
1. तहसील कार्यालयात माफक दरात ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारे कर्मचारी नेमावेत.
2. महाऑनलाईन सेवा केंद्रांसाठी दर निश्चित करावे व जाहीर करण्यात यावेत.
3. अवाजवी दर आकारणाऱ्या केंद्रांवर त्वरित कारवाई करण्यात यावी.
प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज –
या प्रकरणात माननीय तहसीलदार साहेबांनी तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा सामान्य जनतेचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.