राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत जिल्हा परिषद प्रशाला सिरसाव राज्यात तृतीय – गावाचा अभिमान वाढवणारी कामगिरी
स्टार माझा न्यूज | परांडा प्रतिनिधी – गोरख देशमाने
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे संचालक मा. डॉ. राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रथमच हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि नाविन्यपूर्ण प्रयोगशीलता वाढवण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
ही राज्यस्तरीय स्पर्धा दि. 12 मार्च 2025 रोजी पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे पार पडली. राज्यभरातील 36 जिल्ह्यांतून 88 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती.
सिरसाव शाळेच्या विद्यार्थिनींची भव्य कामगिरी – गावाचा नावलौकिक वाढवला
परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला, सिरसाव येथील सातवीच्या विद्यार्थिनी कु. वैष्णवी प्रशांत नवले आणि कु. मानसी अविनाश गावकरे यांनी या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून आपल्या शाळेचा, गावाचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
स्पर्धेतील प्रकल्पाचा विषय – “भरडधान्य”
या विद्यार्थिनींनी “भरडधान्य” या विषयावर आधारित नवीन संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रम सादर केला.
➡️ प्रकल्पामधील महत्त्वाचे मुद्दे:
विद्यार्थ्यांच्या पौष्टिक आहाराविषयी जनजागृती
जंक फूडऐवजी भरडधान्याचे सेवन वाढवण्याचा संदेश
विविध भरडधान्यांचे पदार्थ तयार करून त्यांचे सादरीकरण
प्रकल्पामधील नाविन्यपूर्ण संकल्पना
विद्यार्थिनींनी भरडधान्याच्या विविध रेसिपीचे बुकलेट तयार केले.
मिलेट बार, नाचणी वडी, मिक्स धान्याची चकली यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार केले.
“भरडधान्ययुक्त ताट”, “रेसिपीजचे झाड”, “भरड धान्य उतरंडी”, “भरडधान्याची बैलगाडी” यांसारख्या संकल्पना प्रकल्पात सादर केल्या.
रेसिपींसाठी क्यूआर कोड तयार करून डिजिटल माहिती उपलब्ध करून दिली.
शाळेच्या शिक्षिका दीपाली सबसगी यांचे मार्गदर्शन
या प्रकल्पासाठी शाळेतील विज्ञान शिक्षिका सौ. दीपाली सबसगी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि पौष्टिक आहारासाठी सतत प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांनी जंक फूड टाळून पौष्टिक भरडधान्याचे सेवन करावे हा संदेश त्यांनी या उपक्रमातून दिला.
राज्यस्तरीय स्तरावर गौरव
या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने मा. डॉ. राहुल रेखावार (संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन परिषद), मा. महेश पालकर (संचालक, योजना विभाग), मा. कृष्णकुमार पाटील (संचालक, बालभारती, पुणे), मा. हिरालाल सोनवणे (संचालक, क्रीडा विभाग, पुणे), मा. डॉ. कमलादेवी आवटे (उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, पुणे) यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
गाव व जिल्ह्यात आनंदाचे वातावरण – सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
या यशाबद्दल डाएट धाराशिवचे प्राचार्य डॉ. जटनुरे साहेब, गटशिक्षणाधिकारी खुळे साहेब, शाळेचे मुख्याध्यापक श्री. खटाळ सर, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे अभिनंदन केले आहे.
ही शाळा ‘स्टार माझा न्यूज’चे संपादक रियाज पठाण यांच्या गावातील असल्याने, या यशाचा त्यांना विशेष आनंद झाला आहे. त्यांनी विद्यार्थिनींना भविष्यातील यशासाठी शुभेच्छा देत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या कौशल्याचा विकास करावा, असे मत व्यक्त केले.
हे यश परंडा तालुक्यासाठी अभिमानास्पद असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.