स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
सोलापूर : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “मला अडवायला रोज काळ्या बाहुल्या रोवतंय, पण कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं वाकडं करू शकत नाही,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
शनिवारी (ता. २२) रात्री माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजप शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते. नुकतीच त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटकेची कारवाई केली. त्यानंतर गोरेंनी जोरदार भाषण करत आपली भूमिका स्पष्ट केली.
“जनता आणि देवाभाऊ माझ्या पाठीशी आहेत”
या कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, “अख्खा जिल्हा आणि अख्खं राज्य मला अडवण्यासाठी रोज पूजा घालतंय, काळ्या बाहुल्या रोवतंय. पण मी कधी थांबलो नाही आणि थांबणारही नाही. माझ्या मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी उभी आहे, त्यामुळे कोणी काहीही केलं तरी माझं वाकडं करू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले, “मी एका साध्या घरातील पोरगा असूनही तीन वेळा आमदार झालो. प्रत्येक निवडणुकीच्या आधी माझ्यावर केस दाखल केली जाते. पण मतदार या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. माझ्या पाठीशी माझ्या माता-माऊली आहेत, त्यामुळे माझ्यावर कितीही आरोप झाले तरी माझं काहीही होणार नाही.”
गेल्या काही दिवसांपासून जयकुमार गोरे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र, या आरोपांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांना स्पष्ट संदेश दिला आहे.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.