बार्शी सराफा बाजारात खळबळ! विश्वासू कारागिराचा मालकाला 38.40 लाखांचा गंडा

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

कारागिरानेच मालकाला लुटलं! बार्शीतील सराफा बाजारात मोठी खळबळ



बार्शी, दिनांक. 17 मार्च 2025: बार्शी शहरातील प्रसिद्ध सराफा व्यवसायिक संजय महादान्य यांना त्यांच्या दुकानातील कामगाराने तब्बल 425 ग्रॅम सोनं आणि रोख रक्कम मिळून 38.40 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसवला आहे. या प्रकरणी संबंधित सुवर्णकार कामगार शुभम शरद वेदपाठक (रा. मंगळवार पेठ, बार्शी) याच्या विरोधात बार्शी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

संजय महादान्य हे गेल्या 30 वर्षांपासून बार्शी शहरात ‘मोहित अलंकार’ या नावाने सराफा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे अनेक ग्राहक दागिन्यांची निर्मिती आणि दुरुस्ती करण्यासाठी येतात. त्यांच्या दुकानात शुभम वेदपाठक हा 7-8 वर्षांपासून सुवर्णकार म्हणून काम करत होता. विश्वासाने संजय महादान्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडे ग्राहकांचे सोने दागिने बनवण्यासाठी दिले होते.

विश्वासघाताची बाब कशी उघड झाली?

12 मार्च रोजी संजय महादान्य यांनी शुभमला मागील काही महिन्यांत दिलेल्या सोन्याच्या हिशोबाची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने त्यांनी दुकानातील ड्रॉवर तपासला, परंतु तिथे दागिने किंवा सोने सापडले नाही.

यावेळी संजय महादान्य आणि त्यांच्या पत्नीने शुभमला विश्वासात घेत विचारले असता त्याने संपूर्ण सोने मोडून पैसे जुगारात उडवले असल्याची कबुली दिली.

सोन्याची संपूर्ण यादी:

दुकानातून गायब झालेल्या सोन्याची किंमत ₹38,40,352/- असून, त्यात खालीलप्रमाणे हिशोब आहे:

दुकानातील सोन्याची लगड: 282 ग्रॅम 300 मिली (₹24,84,240/-)

ग्राहकाच्या सोन्याचे पाटल्या: 50 ग्रॅम (₹4,40,000/-)

दुरुस्तीसाठी आलेले गंठन, अंगठी, झुबे: 31 ग्रॅम (₹2,72,800/-)

कारागिरास दिलेले सोने: 09 ग्रॅम 440 मिली (₹83,072/-)

ग्राहकाचे झुबे-टॉप्स: 05 ग्रॅम (₹44,000/-)

ग्राहकाचे सोन्याचे कानातील टॉप्स: 07 ग्रॅम (₹61,600/-)

ग्राहकाचे झुबे-टॉप्स: 04 ग्रॅम 500 मिली (₹39,600/-)

ग्राहकाचे झुबे-टॉप्स: 03 ग्रॅम 500 मिली (₹30,800/-)

ग्राहकाचे गंठन: 32 ग्रॅम 300 मिली (₹2,84,240/-)

दुकानातील रोख रक्कम: ₹1,00,000/-


धमकी आणि पोलिस तक्रार

शुभम वेदपाठक याने चोरी कबूल करत “मी काही दिवसांत सोने परत करतो” असे सांगून वेळ मागितली. मात्र, संजय महादान्य यांनी वेळ देण्यास नकार दिल्यावर त्याला पोलिसात तक्रार करू नका, नाहीतर पाहून घेईन अशी धमकी दिली. तसेच, शुभमच्या कुटुंबीयांनी संजय महादान्य यांच्याकडे सोने परत करण्यासाठी काही वेळ मागितला, पण ग्राहकांच्या दागिन्यांची जबाबदारी असल्याने त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिस तपास सुरू

बार्शी पोलिस ठाण्यात शुभम वेदपाठक याच्या विरोधात विश्वासघात, फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी पोलीस अधिक तपास करत आहेत,अशी माहिती पोलिसांनी दिली.

(स्टार माझा न्यूजसाठी विशेष रिपोर्ट)

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!