स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा, ता. १७ (प्रतिनिधी):
परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथे १८ वर्षीय युवक माऊली बाबासाहेब गिरी याला प्रेमसंबंधाच्या कारणावरून अमानुष मारहाण करण्यात आली. गंभीर अवस्थेत १४ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी (ता. १६) सकाळी सोलापूर येथील रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रेमसंबंधातून भडकलं रागाचं रूप
माऊली गिरी हा भूम तालुक्यातील दुधोडी येथील रहिवासी होता. त्याचे परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील एका विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. संबंधित महिला वडाचीवाडी येथे मामाकडे राहत होती. शाळेपासूनच हे प्रेमसंबंध सुरु होते आणि तिचे लग्न झाल्यानंतरही संपर्क कायम होता.
३ मार्च रोजी व्हॉट्सअॅपवर दोघांमध्ये संवाद झाला. हा संवाद मुलीच्या पतीने पाहिला आणि त्याने माऊलीला भेटण्यासाठी पांढरेवाडी येथे बोलावले. तेथे पोहोचताच, मुलीच्या पतीसह तिचे वडील आणि अन्य चार ते पाच जणांनी त्याला घरात कोंडून लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. अत्याचार इतके भयंकर होते की, आरोपींनी त्याला मयत समजून नग्न अवस्थेत रस्त्यालगत फेकून दिले.

गंभीर अवस्थेतील माऊलीची मृत्यूशी झुंज
घटनेची माहिती मिळताच, गावकऱ्यांनी माऊली गिरीला तत्काळ जामखेडच्या रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. १४ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाही रविवारी सकाळी साडेदहा वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.
गावकऱ्यांनी वर्गणी करून केले उपचार
माऊलीचे वडील बाबासाहेब गिरी हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाने २०२१ मध्ये आत्महत्या केली होती. माऊलीला लष्करात भरती होण्याचे स्वप्न होते. त्याच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी वर्गणी करून आर्थिक मदत केली होती. मात्र, अखेरीस माऊलीला वाचवता आले नाही.
पोलीस कारवाई आणि आरोपींची स्थिती
या प्रकरणी ८ मार्च रोजी अंभी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या चार आरोपी—
1. सतीश जगताप (पांढरेवाडी)
2. राहुल मोहिते (पांढरेवाडी, परंडा)
3. आकाश मगर (शेळगाव, परंडा)
4. विजय पाटील (सोनारी, परंडा)
यांना पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
गोरक्ष खरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अंभी यांची प्रतिक्रिया:
“माऊली गिरीच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांकडे मृतदेह सोपवण्यात आला आहे. गुन्ह्यात कठोर कारवाई करून उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.”
मृत माऊली गिरीचे वडील बाबासाहेब गिरी यांची व्यथा:
“माझ्या मुलाच्या प्रेमसंबंधाबाबत मला काहीच माहिती नव्हती. जर कोणीतरी मला सांगितले असते, तर मी त्याला समजावले असते. आम्ही गोसावी समाजातील असून, भिक्षुकरी करून जीवन जगतो. आधीच माझ्या मोठ्या मुलाने आत्महत्या केली आहे. माऊलीच्या मृत्यूने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्व आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी माझी मागणी आहे.”
गावकऱ्यांची न्यायासाठी मागणी
गावकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून उर्वरित आरोपींना अटक करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.