परंडा उरुसात शाहीरी डफावर थाप देत समाजप्रबोधनाचा कार्यक्रम सादर.

Picture of starmazanews

starmazanews

उरुसानिमित्त परंडा येथे शाहिरी कलगीतुऱ्याचा शानदार कार्यक्रम



स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने


परंडा, ता. ११ (प्रतिनिधी) – .
परंडा शहरात सुफी संत हजरत ख्वाजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद यांच्या ७०५ व्या उरुसानिमित्त शाहिरी लोककलेचा एक शानदार कलगीतुरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला १० जानेवारी रोजी मुख्य मंडई चौकात प्रारंभ झाला असून, सलग तीन दिवस दुरगाव व अन्य भागांतून आलेले शाहीर आपल्या शाहिरी कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत आहेत.

कलगीतुरा – ग्रामीण लोककलेचा उत्सव
कलगीतुरा ही पारंपरिक शाहिरी लोककला असून, गेल्या ३०० वर्षांपासून या कलेची परंपरा अखंडपणे सुरू आहे. डफ, तुणतुणे, टाळ, पेटी, ढोलकी यांसारख्या वाद्यांच्या साथीने शाहीर समाजाला मनोरंजनातून विविध सामाजिक संदेश देत आहेत.

या कार्यक्रमात कलगीवाले शाहीर आणि तुरेवाले शाहीर यांच्यात शंकर-पार्वती संवादाच्या स्वरूपात सवाल-जवाब होतो. पुरुषांची बाजू कलगीवाले मांडतात, तर महिलांची बाजू तुरेवाले मांडतात. या संवादातून समाजातील अंधश्रद्धा, शैक्षणिक अज्ञान, जातीय भेदभाव, स्त्रीभ्रूणहत्या, दारूबंदी, पाणी जपून वापरणे यासारख्या विषयांवर प्रहार करून जनजागृती केली जाते.

शाहीर कलाकारांचा सहभाग
या कार्यक्रमात दुरगावचे शाहीर बन्सी कांबळे, नंदुभाऊ कांबळे (करमाळा), कल्याण माळी (कार्ला), संभाजी लोकरे (भूम) यांच्यासह तुरेवाले शाहीर राजु वाघमारे (मोहोळ), सुरेश माळी (रोपळे, ता. माढा) यांनी सहभाग घेतला. ढोलकी, तुणतुणे, टाळ व मंजीरी वाजवणाऱ्या कोरस कलाकारांनीही उत्कृष्ट साथ दिली.

कलगीतुरातून सामाजिक संदेश
या शाहिरी कलेच्या माध्यमातून कलाकारांनी राष्ट्रीय एकात्मता, स्त्री सन्मान, जातीय एकोपा यावर भर देत समाजप्रबोधन केले. स्वच्छ भारत अभियान, पाणी आडवा-पाणी जिरवा, दारुबंदी, हुंडाबंदी यासारख्या विषयांवरून प्रबोधन करताना शाहीरांनी समाजाला जागृत करण्याचे काम केले.

उरुस कमिटीचा पुढाकार
या कार्यक्रमाचे आयोजन उरुस कमिटीने केले असून, कमिटीचे अध्यक्ष इमरान मुजावर, रफिफ मुजावर, एजाज मुजावर, निसार मुजावर, समीर मुजावर, मलिक मुजावर आणि शब्बीरखाँ पठाण यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

शाहीर कलाकारांसाठी शासनाकडे मागणी
या कार्यक्रमात सहभागी जेष्ठ शाहीर बन्सी गोविंद कांबळे यांनी शाहीर कलाकारांसाठी शासनाने दरमहा मानधन सुरू करावे अशी मागणी केली आहे. तसेच ७५ वर्षांखालील शाहीर कलाकारांना एस.टी. प्रवास मोफत करावा, तसेच निवारा व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “ग्रामीण भागातील अस्सल शाहिरी लोककला लोप पावत आहे. फार कमी शाहीर उरले आहेत. या कलेचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.”

उरुसाचा समारोप आज होणार
कलगीतुरा कार्यक्रमाचा समारोप आज रविवारी, ता. १२ रोजी सायंकाळी होणार आहे. कार्यक्रमास ग्रामीण भागातील नागरिक आणि परंडा शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!