स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
कोल्हापूर प्रतिनिधी दिनांक 16 डिसेंबर. कोल्हापूरच्या वारणा विद्यालयाच्या मैदानावर वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या ३० व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित भारत विरुद्ध इजिप्त आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम रंगला. या रोमांचक कुस्ती महोत्सवात महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातून हजारो कुस्तीप्रेमी जमले होते. मैदानात प्रमुख अकरा शक्तीश्री किताबांसह लहान-मोठ्या २५० लढती पार पडल्या.
‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताब: सिकंदर शेखचा डाव आणि विजय
प्रथम क्रमांकाच्या ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबासाठी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि इजिप्तच्या अहमद तौफिक यांच्यात लढत झाली. दोन्ही मल्लांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. मात्र, सहाव्या मिनिटाला सिकंदर शेखने आपला अनुभव आणि ताकद सिद्ध करत ‘घिस्सा डाव’ टाकून अहमद तौफिकला चितपट केले. या विजयाने सिकंदर शेखला मैदानातील शौकिनांची वाहवा मिळवून दिली. त्याला आमदार डॉ. विनय कोरे आणि डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते ‘जनसुराज्य शक्ती’ किताब प्रदान करण्यात आला.
‘वारणा साखर शक्ती’ किताब: पृथ्वीराज पाटीलची अप्रतिम कामगिरी
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि जागतिक विजेता सल्लाउद्दीन अब्बास यांच्यात ‘वारणा साखर शक्ती’ किताबासाठी रंगलेली लढत अत्यंत अटीतटीची ठरली. तब्बल १६ मिनिटे रंगलेल्या या लढतीत पृथ्वीराजने नाकपटी घिस्सा डावावर अब्बासला चितपट केले. सव्वासहा फुटी उंचीच्या अब्बासला कमी उंची असलेल्या पृथ्वीराजने टक्कर देत विजय मिळवला.
‘वारणा दूध संघ शक्ती’ किताब: भूपेंद्र अजनाळाचा पराक्रम
पंजाबच्या भूपेंद्र अजनाळाने उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळकेला घुटना डावावर चितपट करत ‘वारणा दूध संघ शक्ती’ किताब पटकावला. अवघ्या सहा मिनिटांत भूपेंद्रने हा विजय संपादन केला.
इतर प्रमुख लढती: दिनेश गुलिया आणि दादा शेळके यांची आघाडी
‘वारणा बँक शक्ती’ किताबासाठी दिल्लीतल्या दिनेश गुलियाने प्रकाश बनकरला चितपट करत २८ मिनिटांच्या लढतीत विजय मिळवला.
‘वारणा दूध साखर वाहतूक शक्ती’ किताबासाठी पुण्याच्या दादा शेळकेने हरियाणाच्या मनजीत खत्रीला पाय लावून घिस्सा डावावर चितपट केले.
कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी
या महोत्सवाने भारतातील पारंपरिक कुस्तीचा दर्जा आणि भारतीय मल्लांचे कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले. इजिप्तसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्लांच्या सहभागाने कुस्तीप्रेमींना प्रेक्षणीय लढतींचा आस्वाद घेता आला.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.