नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती.

Picture of starmazanews

starmazanews

सतर्कता आणि सहकार्य : आपत्ती व्यवस्थापनाचा मार्ग.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

उस्मानाबाद :- दिनांक 21 जुलै 2023
कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही.त्यामुळे आपत्तीवर मात करण्यासाठी प्रत्येकाने सतर्क असले पाहिजे.जर आपत्ती ओढवलीच तर त्यावर सहकार्याने मात करणे शक्य होते.पूर्वीच्या काळात येणारी संकटे ही बहुतांश नैसर्गिक असत.मानवाने प्रगतीला जसजशी सुरुवात केली, तसतशी संकटेही वाढू लागली. मानवाने आपली प्रगती करताना निसर्गाच्या व्यवस्थेत ढवळाढवळ करायला सुरूवात केली.त्यामुळे मानव आणि निसर्ग यांच्यामध्ये गुंतागुंत अधिकच वाढत गेली.वाढती लोकसंख्या आणि प्रगती करताना निसर्गाच्या मार्गात आणलेल्या अडथळ्यामुळे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशी दुहेरी संकटे निर्माण झाली.

नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. नैसर्गिक घडामोडीतून घडणाऱ्या आपत्ती ह्या नैसर्गिक असतात. मानवांच्या विशिष्ट कृत्यातून घडणाऱ्या आपत्ती ह्या मानव निर्मित असतात. अतिवृष्टी महापूर, वाळू- वादळ, हिम- वादळ, धूळ-वादळ,चक्रीवादळ,भूकंप,ज्वालामुखी,त्सुनामी,भूस्खलन,वीज कोसळणे, धुके पडणे,उष्ण व शितलहर,दुष्काळ, संसर्गजन्य रोग,कीड व उल्कापात ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत.मानवनिर्मित आपत्तीमध्ये अपघात, आग, वणवा, दरोडा, वायुगळती, तेलगळती, कारखाना व खाणीतील विस्फोट, युद्ध, चेंगराचेंगरी,अणुस्फोट जैविक अस्त्रांचा स्फोट,बॉम्बस्फोट,इमारत कोसळणे,हत्या,दहशतवाद,गुन्हेगारी, अणुभट्टीतील किरणोत्सर्ग,माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित गुन्हेगारी आणि त्यामधून उदभवणारी संकटे आदींचा यामध्ये समावेश करता येईल. आपत्तीचे परिणाम हे मानवी जीवनावर दूरगामी असतात. आपत्तीमुळे जीवित व वित्तीय नुकसान होते.आपत्तीमुळे पर्यावरणात असंतुलन निर्माण होते.आपत्तीमुळे मानवी जीवनात अडथळे निर्माण होतात. कोरोनासारख्या आपत्ती मानवी जीवन तर उध्वस्त करतातच सोबत अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम करतात.नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीवर जर काही प्रमाणात मात करायची असेल,तिची तीव्रता कमी करायची असेल तर आपल्याला आपत्तीचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे आहे.

वाढत्या लोकसंख्येची घनता ही प्रदेशाच्या परिस्थितीत बिघाड घडविण्यास मानव कारणीभूत ठरला आहे.भूकंप,नद्यांना येणारे पूर यामुळे होणारी जीवितहानी लोकसंख्येच्या घनतेमुळे मोठी असते.विकासाच्या मागोमाग आपत्तीचा धोका अधिकाधिक वाढतांना दिसत आहे. मानवी जीवनामध्ये आपत्ती हा एक अविभाज्य घटक झाला आहे.ती अटळ आहे.मात्र ती ओढवू नये यासाठी प्रत्येकाने सतर्कता बाळगली पाहिजे.आपत्ती जर ओढवली तर तिचा प्रतिकार करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.आपत्तीची तीव्रता कमी करता येते.आपत्ती निवारण ही कोणा एकाची जबाबदारी नसते.सरकार,शासन यंत्रणेतील सर्व घटक,उद्योगपती,विविध क्षेत्रातील व्यवसायिक,विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था,विविध समुह आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व टप्प्यातील सर्व क्रियांमध्ये प्रत्येक व्यक्तीचा सक्रीय सहभाग असणे महत्त्वाचे आहे.आपत्तीच्या काळात कोणती ना कोणती तरी जबाबदारी ही प्रत्येकाला किंवा समूहाला घ्यावीच लागते.तरच आपण आपत्तीचे निवारण यशस्वीपणे करू शकतो.

आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन आणि आपत्ती नंतरचे व्यवस्थापन हे आपत्ती व्यवस्थापनाचे महत्वाचे तीन टप्पे आहे.आज विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे.अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमुळे संभाव्य आपत्तीच्या भागांमध्ये धोक्याची पूर्वसूचना देण्यात येते.सजगतेमुळे आपत्ती



कोसळल्यावर कमीत कमी नुकसान होते.उदाहरण दयायचे झाल्यास वादळ येणार असल्याने मासेमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच समुद्र काठावर राहणाऱ्या नागरिकांना आवाहन करण्यात येते.

त्यामुळे आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात हे ठरविता येते.आपत्ती निवारणासाठी सुयोग्य संघटन निर्माण करण्यात येते.

पावसाळ्याच्या दिवसात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती आपल्याला उपग्रहाच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने प्रसार व समाजमाध्यमातून त्याबाबतची व्यापक प्रसिद्धी करण्यात येते.ज्या संभाव्य भागात पूरपरिस्थिती निर्माण होणार आहे,त्या भागातील नागरिकांना देखील त्याबाबतची पूर्वकल्पना देऊन त्यांना सुरक्षितस्थळी पोहचविले जाते.जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन या परिस्थितीत पूर्ण लक्ष ठेवून काम करीत असते.जीवित हानी होणारच याची दक्षता घेतली जाते.वित्त हानी कमीतकमी होण्यावर भर दिला जातो. पुरात अडकलेल्या व्यक्तींना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोहणाऱ्या व्यक्ती तसेच शोध व बचाव पथकांची मदत घेतली जाते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत घेण्यात येते.

आपत्कालीन व्यवस्थापन हा आपत्ती व्यवस्थापनाचा महत्वाचा टप्पा आहे.यामध्ये बचाव आणि शोध हा मार्ग आहे.यामध्ये आपत्ती पीडितांना त्या आपत्तीमधून सोडविण्यासाठी मदत केली जाते. आपत्ती व्यवस्थापन दलाकडून आपत्तीग्रस्तांना त्वरित प्रतिसाद देण्यात येतो.त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काम करण्यात येते. शासन प्रशासन यंत्रणेच्या जोडीने आपत्तीपूर्व,आपत्ती दरम्यान आणि आपत्ती पश्चात कोणकोणती कामे करावीत त्याचे नियोजन करण्यात येते.केंद्र सरकार,राज्य सरकार आणि जिल्हापातळीवर जिल्हा प्रशासनाची स्वतंत्र यंत्रणा काम करीत असते. प्रत्येक पातळीवर प्राधिकरणाचे अधिकार,कार्यकक्षा आणि जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या असतात.त्यांचे अधिकार देखील निश्चित केले जातात.अधिकार आणि जबाबदाऱ्यांचे काटेकोरपणे विभागणी झालेली असते.मंत्री आणि सचिव यांच्या पातळीवर निर्णय घेतले जातात.त्याची अंमलबजावणी अधिकाऱ्यांपासून ते अखेरच्या पातळीवरील शासन यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्य करावे लागते.निसर्गनिर्मित आपत्ती टाळता येणार नाही.परंतु मानवनिर्मित आपत्ती टाळणे,तिची तीव्रता कमी करणे व त्यापासून होणाऱ्या हानीचे प्रमाण नक्कीच कमी करता येणे शक्य आहे.

येणाऱ्या आपत्तीची चाहूल जर आपल्याला आधीच लागली तर त्याबाबत लोकांना वेळीच सावध करणे,होणारी हानी कमी करणे शक्य आहे.वैज्ञानिक प्रगतीमुळे आणि अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमुळे आता त्सुनामी,वादळे,गारपीट, अतिवृष्टीचा अंदाज घेणे शक्य झाले आहे.पूर्व अंदाज घेऊन लोकांना त्याविषयी आधीच कल्पना देता येते. प्रशासन यंत्रणा कार्यक्षमतेने काम करीत असताना आणि लोकांनी अतिउत्साही न होता योग्य संयम दाखवून प्रशासनाला प्रतिसाद दिला तर आपत्तीवर मात करणे शक्य आहे.

आपत्ती निवारण व्यवस्थापनात जनतेशी योग्य प्रकारे संवाद साधून त्यांच्या मनातील भीती नाहीशी करणे हे नियंत्रण आणि कार्यक्षम अंमलबजावणीत महत्त्वाचे आहे. संपर्क यंत्रणेची भूमिकाही महत्त्वाची असते.आपत्ती व्यवस्थापन ही आज काळाची गरज झाली आहे.आपत्तीत आलेला प्रसंग निवारण्यासाठी सर्वाधिक गरज असते ती साधनसामग्रीची.आपत्तीतून लोकांचा बचाव व त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी विविध प्रकारची साधनसामग्री आवश्यक असते. कोणत्या प्रकारची,कीती साधनसामुग्री हवी व ती तात्काळ कोठून मिळविता येईल याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाजवळ असावी.नसली तर ती त्यांनी तात्काळ कोठून मिळविता येईल याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाजवळ असली पाहिजे.जसे पोहणाऱ्या व्यक्तींची,सर्प मित्रांची, बिछायत केंद्र,सेवाभावी संस्था,दानशूर व्यक्तींची,रुग्णवाहिकांची आणि डॉक्टरांची अद्ययावत यादी आणि त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध असले पाहिजे.आपत्तीत सापडलेल्या लोकांचे



लवकरात लवकर स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणून व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची रीतसर नोंद घेतली पाहिजे.आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी व पुनर्वसनासाठी करावयाच्या गोष्टी या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार असतात.

आपत्ती लहान किंवा मोठी असली तरी तिच्या नियंत्रणासाठी कितीही पूर्वतयारी केली तरीही आपत्तीच्या प्रसंगी ती कमीच असते. अचानक आलेल्या आपत्तींना तोंड देण्यासाठी तिथे आलेले नागरिकच शासकीय यंत्रणेला मदतीसाठी सर्वप्रथम धावून जातात.आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी दाखविलेली एकजूट महत्त्वाची ठरते. आपत्तीबाबत पूर्वतयारी,आपत्तीचा सामना करणे व आपत्तीनंतरचे पुनर्वसन याबाबत लोकशिक्षण देणे आवश्यक आहे.तसेच पुरेशी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. आपत्तीच्यावेळी गोंधळाची स्थिती जितकी कमी असेल तितके तिचे प्रमाण कमी असते,तितकी परिस्थितीही लवकर पूर्ववत होण्यास मदत होते. यावर आपत्ती निवारणाचे यश अवलंबून आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!