www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
उस्मानाबाद (धाराशिव) प्रतिनिधी दिनांक : 12 जुलै 2023 .
शासनाच्या विविध विभागाशी सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,शेत मजूर,महिला,विद्यार्थ्यांचा व समाजातील विविध घटकांचा संबंध येतो.राज्य सरकार राज्यातील जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने विविध योजनांची अंमलबजावणी करीत असते.देशातील एक प्रगतीशील राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले,सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रगल्भ विचारानेच राज्याचा प्रगतीशील आणि पुरोगामी राज्य म्हणून नावलौकीक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या दुरदृष्टीतून राज्याच्या विकासाचा आलेख सातत्याने वाढतांना दिसत आहे.
राज्यातील प्रत्येक नागरीक हा विकासाच्या प्रवाहात यावा.त्याचा सर्वांगीण विकास व्हावा,यासाठी राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून “ शासन आपल्या दारी ” हा उपक्रम १५ एप्रिल ते ३० ऑगस्ट २०२३ या कालावधीत राज्यात राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याला नुकतीच ७५ वर्ष पुर्ण झाली.या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यातील सर्व ३६ जिल्हयातील प्रत्येकी ७५ हजार विविध योजनांच्या लाभार्थ्यांना एकाच दिवशी एकाच छताखाली लाभ देण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे.प्रत्येक जिल्हयात ७५ हजार लाभार्थ्यांनाच नाही तर ती लाभार्थ्यांची संख्या लाखाच्या वर जात आहे हे आपण आतापर्यंत काही जिल्ह्यात झालेल्या जिल्हास्तरावरील कार्यक्रमातून बघितले आहे.” शासन आपल्या दारी ” या उपक्रमातून शासनाच्या विविध योजनांची वेगवान व पारदर्शक अंमलबजावणी होतांना दिसत आहे.
” शासन आपल्या दारी ” हा उपक्रम गतीमान व पारदर्शकपणे यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारचे विविध विभाग गावपातळीवर सुक्ष्म नियोजनातून काम करीत आहे.जो लाभार्थी ज्या योजनेच्या लाभासाठी पात्र आहे,त्यासाठी आवश्यक असणारे कमीत कमी कागदपत्रे लाभार्थ्यांकडून एकत्र करून लाभ देणे सुरु आहे.गावपातळीवरचा कोणत्याही योजनेचा पात्र लाभार्थी हा योजनेच्या लाभापासून,दाखल्यापासून व प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून यंत्रणा काम करत आहे. या उपक्रमाचा एक भाग असलेल्या ” हर घर दस्तक ” अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी गावपातळीवर थेट लाभार्थ्यांच्या दारी पोहचून योजनांची माहिती देऊन त्यांना पाहिजे असलेल्या योजनांच्या लाभाचे अर्ज भरून घेत आहे.तात्काळ आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन अल्प कालावधीतच लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देत आहे.पूर्वी शासकीय कार्यालयाचे योजनेचा लाभ मिळण्यासाठी उंबरठे झिजविणाऱ्या लाभार्थ्याना आता ” शासन आपल्या दारी ” उपक्रमामुळे अल्पकालावधीत लाभ मिळत आहे.त्यामुळे लाभार्थी आनंदित आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागाच्या लाभार्थ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात विशिष्ट आर्थिक तरतूद करण्यात येते.अनेकदा लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती नसल्याने त्यांना योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागते.योजनेची अंमलबजावणी करणारा विभाग हा त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रचार-प्रसिध्दी करुन नियमितपणे अंमलबजावणी करीत असतात.
“ शासन आपल्या दारी ” या उपक्रमातून विविध योजना गतिमान होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी होतांना दिसत आहे.एकाच छताखाली कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देणारा हा उपक्रम आहे.या उपक्रमातून राज्य शासनाचे लोककल्याणकारी पाऊल पुढे पडतांना दिसत आहे.या उपक्रमाचा समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येत आहे.प्रत्येक जिल्हयात या उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनात जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.विविध योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्याचे काम संबंधित विभाग करीत आहे.संबंधित योजनांच्या प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे तसेच त्या लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांसह परिपुर्ण अर्ज भरुन घेण्यात येत आहे.जिल्हाधिकारी हे या उपक्रमाचे जिल्हा प्रमुख आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली “ शासन आपल्या दारी ” या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय यंत्रणा प्रमुखांच्या सभा घेण्यात येत आहे.यंत्रणांच्या जिल्हा प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या तालुका यंत्रणा प्रमुखांच्या देखील सभा घेण्यात येत आहे.तसेच तालुका यंत्रणा प्रमुख हेसुद्धा त्यांच्या कार्यकक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सभा घेवून गावपातळीवरील प्रत्येक लाभार्थ्याला त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देऊन त्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांचे परिपुर्ण अर्ज भरुन घेऊन संबंधित लाभार्थ्याला लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून यंत्रणा लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे. संबंधित यंत्रणा लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देत आहे.या उपक्रमामुळे आपल्याला निश्चितपणे योजनांचा लाभ मिळेल हा विश्वास लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. कमी कालावधीत योजनांचा लाभ मिळणार असल्यामुळे लाभार्थ्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला अमृत महोत्सवी वर्षात हातभार लागण्यास या उपक्रमाची मदत होत आहे.
जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकाच छताखाली लाखो लाभार्थ्यांना विविध योजनांचे दाखले व लाभाच्या स्वरूपात वस्तू व साहित्याचे वितरण करण्यात येत आहे.एकाच छताखाली लाखो लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे हा विक्रमच ठरत आहे.पूर्वी लाभार्थ्यांची योजनांचा लाभ मिळण्यासाठी विविध कार्यालयात होणारी पायपीट ” शासन आपल्या दारी ” या उपक्रमाच्या माध्यमातून शासनच त्यांच्या दारी पोहचत असल्याने थांबलेली दिसत आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी गतीमानतेने आणि पारदर्शकपणे होतांना दिसत आहे. योजना कल्याणकारी,सर्वसामान्यांच्या दारी हे चित्र आपल्याला दिसत आहे.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.