www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेला मोठा प्रतिसाद
उस्मानाबाद –
सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आपले अस्तित्व निर्माण करताना आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रातील सर्व गोष्टींचा सूक्ष्मपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी आहेत. त्याचबरोबर आपण कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना व्यक्तीमत्व विकासाला तेवढेच महत्त्व द्यायला हवे, असे मत व्यक्तीमत्व विकास विषयावर मार्गदर्शन करताना प्रसिद्ध वक्ते अर्शद सय्यद यांनी व्यक्त केले.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम) संचलित पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात व्यक्तीमत्व विकास या विषयावर बुधवार, दि. 2 मार्च रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी अर्शद सय्यद यांना आमंत्रित करण्यात आले होते. जेएसपीएमचे संस्थापक सचिव तथा माजी मंत्री, आमदार प्रा.तानाजीराव सावंत व सचिव जी.टी. सावंत यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास पीव्हीपीआयटी (पुणे) चे संचालक डॉ.व्ही.ए.बुगडे, प्राचार्य डॉ.सी.एम. सेदानी, एचओडी प्रा.एस.व्ही. बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अर्शद सय्यद म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धेला सामोरे जाताना मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहेच, पण व्यक्तीमत्व विकास हा देखील तुम्ही यशासाठी प्रयत्न करताना तितकाच महत्वाचा आहे. असे सांगून अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर भविष्यात मिळणार्या संधी आणि त्यासाठी आपण कोणकोणते कौशल्य आत्मसात केले पाहिजे, याविषयी त्यांनी विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट करुन सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकाचे देखील त्यांनी समाधान केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.एस.एस. वाघमारे यांनी केले. यावेळी वसंतदादा पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सुलतान मशायक, अदनान मशायक यांनी परिश्रम घेतले.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.