स्वामिनी संस्था, महाराष्ट्रच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून सन्मानित

Picture of starmazanews

starmazanews



कर्मण्ये वाधिकारस्ते! कर्तव्यदक्ष दिपाली गोरेंचा गौरव, ‘आदर्श मुख्याध्यापिकेचा’ सन्मान

बार्शी – भगवदगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटलंय, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपलं कर्म करत राहा. बार्शीच्या के.एल.ई. सोसायटी, बेळगावी संचलित सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाच्या कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका सौ. दिपाली नितीन गोरे यांचेही कार्य असेच या श्लोकाला आदर्श मानूनच आहे. आपल्या गुणवत्तापूर्ण व प्रेरणादायी कार्यातून त्यांनी आदर्श शिक्षिकेची ओळख निर्माण केली. प्राथमिक शिक्षिका म्हणून शिक्षणसेवेत प्रवेश करून मुख्याध्यापिका पदापर्यंतचा त्यांचा यशस्वी, प्रेरक प्रवास निश्चितच अनुकरणीय आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव स्वामिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्रच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून संस्थेच्या सचिव नेहा विक्रांत पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

शाळेतील बालक मंदिर विभागाने गत 5 वर्षात चिमुकल्यांना विविध उपक्रमातून घडवलं, शाळेची पहिली पायरी म्हणजे बालक मंदिर. मात्र, हे बालक मंदिर या लहानग्यांचं दुसरं घरं बनवण्याची किमया दीपाली गोरे यांनी लीलया पेलली. आपुलकीपूर्ण, प्रेमळ व शिस्तप्रिय स्वभावाच्या गोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करत शिक्षणाबरोबरच संस्कारांवर विशेष भर दिला आहे. बालक मंदिर विभागातील नर्सरीपासून मोठ्या गटातील विद्यार्थ्यांपर्यंत महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी नियमितपणे साजऱ्या करून त्यांच्या महान विचारांचे संस्कार रुजविण्याचे महत्त्वपूर्ण व दूरदृष्टीपूर्ण योगदान त्यांनी दिले आहे. लहान वयातच राष्ट्रभक्ती, सामाजिक जाणीव व नैतिक मूल्यांची भक्कम बीजे विद्यार्थ्यांमध्ये रोवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण व स्तुत्य प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहे.

वर्षभरातील विविध सण, परंपरा व त्यांचे शैक्षणिक महत्त्व चिमुकल्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी अभिनव, कल्पक व परिणामकारक उपक्रम राबविले. पारंपरिक व लोप पावत चाललेले जुने मैदानी खेळ विद्यार्थ्यांना शिकवून शारीरिक विकासासोबतच समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्याचे मौल्यवान कार्य त्यांनी केले. या उपक्रमांचा प्रेरणादायी आदर्श घेऊन बार्शी शहर व तालुक्यातील अनेक शाळांनी आपल्या शाळांमध्ये सकारात्मक व उपयुक्त बदल घडवून आणले आहेत.

सामाजिक बांधिलकी जपत, अतिवृष्टी व ढगफुटीमुळे बाधित झालेल्या मांडेगाव (ता. बार्शी) येथील पूरग्रस्त कुटुंबांना धान्य स्वरूपात मदत करण्यात आली. तसेच अंगणवाडीतील मुलांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करून गोरे मॅडम यांनी ‘मदत नव्हे, कर्तव्य’ या उदात्त भावनेतून समाजाप्रती आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. या स्तुत्य कार्यामुळे सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाचे नाव सोलापूर जिल्ह्यात सन्मानाने व गौरवाने घेतले जाऊ लागले.

के.एल.ई. सोसायटीच्या सर्वेसर्वा सौ. वर्षाताई ठोंबरे-झाडबुके तसेच माजी मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी शैक्षणिक सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व प्रभावीपणे पुढे चालू ठेवली आहे. कला अविष्कार अकॅडमीच्या माध्यमातून कराटे, नृत्य, रायफल शूटिंग, तलवारबाजी अशा विविध क्रीडा व कला प्रकारांतून अनेक गुणवान विद्यार्थ्यांना घडविण्यात त्यांचे विशेष व प्रशंसनीय योगदान आहे.

उपक्रमशीलता, विद्यार्थीप्रिय स्वभाव व पालकांचा विश्वास या त्रिसूत्रीवर आधारित कार्यशैलीमुळे सौ. दिपाली नितीन गोरे मॅडम आज ‘Dipali Gore – Ideal Headmaster’ म्हणून सर्वत्र ओळखल्या जात आहेत. शिक्षण, संस्कार आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम साधणाऱ्या त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे त्या बार्शीतील शिक्षण क्षेत्रासाठी एक आदर्श व दीपस्तंभ ठरत आहेत.
यावेळी उपस्थित पुनम वासकर, भारती चोपडे, तेजश्री स्वामी, दिपाली कळसकर.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!