पावसामुळे उधळलेले नियोजन; मुस्लीम बांधवांनी उचलली मदतीची जबाबदारी; एकतेचा संदेश देणारा सुंदर प्रसंग
पुणे प्रतिनिधी मंगळवार, दिनांक २० मे रोजी पुण्यात पावसाने अचानक हजेरी लावली. संध्याकाळी ६.५६ वाजता वानवडी येथील एसआरपी ग्राउंडवरील अलंकार लॉन्स येथे एका हिंदू विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. साऱ्या तयारीनंतर, योग्य मुहूर्त जवळ आलेला असतानाच, तुफान पाऊस कोसळू लागला. खुले लॉन्स असल्याने पाहुण्यांची पळापळ उडाली आणि संपूर्ण सोहळा अडचणीत आला.
धर्माचं भिंती मोडून माणुसकी पुढे आली
विवाहस्थळी गोंधळ उडाल्यामुळे वऱ्हाडी मंडळींमध्ये चिंता पसरली होती. मात्र सुदैवाने शेजारील हॉलमध्ये एक मुस्लिम नवविवाहित जोडप्याचे रिसेप्शन सुरू होते. संकटसमयी माणुसकीचा हात पुढे करत, हिंदू विवाहातील वडीलधाऱ्या मंडळींनी मदतीची याचना त्या मुस्लिम कुटुंबाकडे केली.
मुस्लिम बांधवांनी दिली मदतीची उब
मुस्लिम कुटुंबातील नातेवाईकांनी कोणताही विचार न करता आपला मंच दीड तासासाठी लग्नासाठी देऊ केला. त्यांनी माणुसकीचे उत्तम उदाहरण ठेवत, दुसऱ्या धर्माच्या विवाहासाठी आपली रिसेप्शन पार्टी थांबवली आणि संपूर्ण स्टेज वापरण्याची मुभा दिली.
संस्कृती आणि नरेंद्रचा विवाह सोहळा सुखरूप पार पडला
या मदतीमुळे चि.सौ.कां. संस्कृती आणि चि. नरेंद्र यांचा विवाह विधी पारंपरिक पद्धतीने, थोडा विलंबाने का होईना, पण अत्यंत मंगल वातावरणात पार पडला. दोन्ही कुटुंबांतील नातेवाईकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत एकतेचा संदेश दिला.
सामाजिक सलोख्याचा सुंदर संदेश
या प्रसंगाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, संकटसमयी धर्म, जात, पंथ या सीमा गौण ठरतात. माणुसकी आणि परस्पर मदतीची भावना या सर्वांपेक्षा मोठी असते. पुण्यात घडलेला हा प्रसंग समाजासाठी एक आदर्श ठरू शकतो.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.