बार्शी शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर: प्रशासन कारवाई करणार का?

Picture of starmazanews

starmazanews


बार्शी: दिनांक16 शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंडा रोड, गाडेगाव रोड, आयटीआय चौक, उपळाई रोड, सुभाष नगर तलाव रोड, बस स्टॅण्ड चौक या भागांत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण दिसून येते. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरातील प्रमुख भाग अतिक्रमणाच्या विळख्यात
बार्शी शहरात शासनाच्या विविध योजनांअंतर्गत प्रशस्त अश्या रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. मात्र, या रस्त्यांवर अनधिकृत अतिक्रमण वाढल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे. छोटे-मोठे व्यावसायिक, हातगाडीवाले आणि काही दुकानदारांनी पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा उरत नाही. परिणामी, पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.

वाहतुकीला अडथळा आणि नागरिकांची गैरसोय
अतिक्रमणामुळे शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुख्य चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक आणि वाहनचालक यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहनांच्या चुकीच्या पार्किंगमुळे समस्या अधिकच गंभीर झाली आहे.

नगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने याकडे गांभीर्याने पाहावे आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. काही ठिकाणी आर्थिक लागेबांधे असल्याची चर्चा असून, त्यामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. जर वेळेत यावर उपाय न काढल्यास अतिक्रमण अधिक रौद्ररूप धारण करू शकते.

तातडीने कारवाई आवश्यक
नगरपालिकेने शहरातील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. तसेच, भविष्यात पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा, शहराच्या सौंदर्यावर आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होईल.

(बातमीसाठी आपले मत व प्रतिक्रिया खालील क्रमांकावर कळवा – 9405749898 / 9408749898)

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!