बार्शी पाणीटंचाई प्रश्न गंभीर – आमदार दिलीप सोपल यांचा आंदोलनाचा इशारा

Picture of starmazanews

starmazanews


बार्शी, दि. 14 मार्च 2025: गेल्या तीन-चार महिन्यांपासून बार्शी शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्याचे आमदार दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शहराला बार्शी-कुर्डुवाडी संयुक्त पाणीपुरवठा अर्थात उजनी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वारंवार लाईन लिकेज होत असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. यामुळे बार्शीकरांना दहा-दहा दिवस पाणी मिळत नाही. पाणीटंचाईबाबत मुख्याधिकारी तसेच जलदाय व्यवस्था अभियंते गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणीपुरवठा केला जात नसल्याने प्रशासन आणि ठेकेदारांची अभद्र युती याला जबाबदार आहे, असे आमदार सोपल यांनी स्पष्ट केले आहे.

स्पेशल ऑडिटची मागणी

बार्शी पाणीपुरवठा विभागाच्या स्पेशल ऑडिटची मागणी देखील त्यांनी केली आहे. आउटसोर्सिंगद्वारे उजनी-चांदणी योजनेच्या देखभाल-दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. तसेच वॉल ओपनर सेवांसाठीही मोठा निधी वापरला जात असतानाही नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही. यामुळे प्रशासनावर संशय व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सध्या नियमित पाणीपुरवठ्याऐवजी चार-चार दिवसांनी पाणी दिले जात आहे. शिवाय, पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पर्यायी व्यवस्था करण्यासही प्रशासन अपयशी ठरले आहे. विशेषतः रमजान महिन्यात आणि इतर सणांच्या काळातही पाणीटंचाई असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

आंदोलनाचा इशारा

लाईन लिकेज रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, पेट्रोलिंग सुरु करावे, लिकेज दुरुस्ती युद्धपातळीवर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात दिला आहे.

(आपले मत कळवा – 9405749898 / 9408749898)
स्टार माझा न्यूज, बार्शी.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!