स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
प्रा. डॉ. वळेकर यांचा विक्रम! कॅन्सर संशोधनासाठी जर्मन पेटंट
परंडा, ता. २० (प्रतिनिधी) – परंडा तालुक्यातील वाकडी गावचे सुपुत्र प्रा. डॉ. नवनाथ जनार्धन वळेकर आणि त्यांच्या संशोधक टीमने ब्रेस्ट कॅन्सरवरील नाविन्यपूर्ण संशोधन केले असून, त्यांच्या या संशोधनाला जर्मन सरकारकडून पेटंट बहाल करण्यात आले आहे. हे संशोधन भविष्यात कॅन्सरवरील उपचार अधिक प्रभावी आणि दुष्परिणामविरहित करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या उल्लेखनीय यशामुळे वाकडी गावात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त अभिनंदन केले आहे.
प्रा. डॉ. वळेकर यांचे शालेय शिक्षण वाकडी येथे झाले असून, सध्या ते शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या रसायनशास्त्र अधिविभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधनात बायोमासमधील नैसर्गिक घटकांचा वापर करून फुरफुरालपासून हायड्राझिनिल थायाझोल हे संयुग विकसित करण्यात आले आहे. हे संयुग ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करू शकते, तसेच उपचारादरम्यान होणारे दुष्परिणाम कमी करण्यास सक्षम आहे.

संशोधनाचे महत्त्व
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विशेषतः महिलांना याचा मोठा फटका बसतो. सध्या प्रचलित उपचारपद्धतींमध्ये सर्जरी, केमोथेरपी, रेडिओथेरपी, हार्मोथेरपी आणि इम्युनोथेरपी यांचा समावेश असला तरी, त्यांचे दुष्परिणाम गंभीर असतात. त्यामुळे अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार शोधणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. वळेकर आणि त्यांच्या टीमचे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरते.
संशोधनासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य
या संशोधनासाठी प्रा. डॉ. शंकर हांगिरगेकर यांचे मार्गदर्शन लाभले असून, संशोधक विद्यार्थी अक्षय गुरव आणि ललित भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या संशोधनाला यश मिळाले आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्रकुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव प्रा. डॉ. व्ही. एन. शिंदे तसेच रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख यांनी संशोधक टीमचे अभिनंदन केले आहे.
डॉ. नवनाथ वळेकर यांच्या या ऐतिहासिक यशामुळे वाकडी गावाचे नाव संपूर्ण देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. त्यांच्या मेहनतीमुळे गावकऱ्यांनी अभिमान व्यक्त केला असून, या संशोधनाचा भविष्यात कॅन्सरवरील उपचारात मोठा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.