बार्शी शहर पोलिसांची नवीन वर्षी सुरक्षेची तयारी; तळीरामांवर कारवाई आणि हरविलेल्या व्यक्तींचा शोध
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
बार्शी प्रतिनिधी, १ जानेवारी २०२५ बार्शी शहर पोलिसांनी नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात नाकाबंदी आणि कोबींग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहरातील लॉज, हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप, एटीएम, आणि बँकांची तपासणी करण्यात आली. याशिवाय, तडीपार गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर आणि इतर माहितीगार गुन्हेगारांची त्यांच्याच राहत्या ठिकाणी चौकशी करण्यात आली.
तळीरामांवर कडक कारवाई
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी मद्यपान करून वाहने चालवणाऱ्या नागरिकांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष नाकाबंदी लावली होती. या मोहिमेत १४३ वाहनांची तपासणी करण्यात आली. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या २८ जणांवर मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १८५ अंतर्गत कारवाई करण्यात आली. याशिवाय, इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४९ जणांवरही दंडात्मक कारवाई करत एकूण १,०५,२००/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
हरविलेल्या व्यक्तींचा शोध आणि बालमजुरीची सुटका
‘ऑपरेशन मुस्कान १३’ या विशेष मोहिमेत २१ हरविलेल्या आणि बेपत्ता व्यक्तींना शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच, बालमजुरी करणाऱ्या ७ बालकांची सुटका करण्यात आली असून त्यांनाही त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बार्शी पोलिसांचे हे पाऊल सामाजिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शहरात अनुशासन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात पोलिसांचा सहभाग उल्लेखनीय आहे.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.